मुंबई, दि. ५ : सीएए, एनपीआर व एनआरसी यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली ६ मंत्र्यांची समिती नेमण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.
यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला असून या समितीमध्ये मंत्री सर्वश्री जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, नवाब मलिक आणि उदय सामंत या मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सीएए, एनपीआर व एनआरसी यासंदर्भात सध्या देशभरात जे एक संभ्रमाचे वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य शासन याबाबतीत काय करणार असा प्रश्न अनेकजण विचारतात. आज नियुक्त करण्यात आलेली ६ मंत्र्यांची ही समिती या विषयांबाबत अभ्यास करेल. आवश्यकतेनुसार आणखी निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळात काय करायचे, पुढे निर्णय कसे घ्यायचे याबाबत ही समिती मार्गदर्शन करेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.