महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करणार – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 5 : राज्यातील महिलांच्या शाश्वत विकासासाठी व महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येकाने स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे. यासाठी संस्कारक्षम समाज निर्माण करणे आवश्यक असून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत केले.

महिला सक्षमीकरणाबाबत सभापती यांनी मांडलेल्या प्रस्तावावर श्री. ठाकरे बोलत होते.

श्री. ठाकरे म्हणाले, राज्यातील महिला सुरक्षिततेसाठी आवश्यक ते सर्व कायदे केले जातील. पण याबरोबरच संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज आहे. आपले राज्य संस्कार देणारे आहे. राज्यात अनेक समाजसुधारक होऊन गेले. चांगला समाज घडवायचा असेल तर वाईट प्रवृत्तींना धडा शिकविला पाहिजे. सर्वांनी पक्ष, प्रांत याचा भेद विसरुन महिला संरक्षणासाठी व महिला विकासासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. माझ्या आजोबांनी हुंडाबळी विरोधात चळवळ केली त्यावेळीही त्यांना त्रास झाला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होणार नाहीत.

निर्भया प्रकरणातील आरोपीला शिक्षा सुनावली पण त्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही. जलद गतीने न्याय मिळण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यातही कायदा आणण्यात येत आहे. आपले रक्षण करायला महिला सैन्यदलात दाखल होत आहे. महिलांचे रक्षण करायला आपणही  पुढे आले पाहिजे. महिला रक्षणासाठी आवश्यक सर्व कायदे करण्यात येतील. त्यापेक्षाही सामाजिक संस्कार महत्त्वाचे आहे. संस्कारातून आपण घडत असतो. संस्कारक्षम समाज घडवायला पाहिजे. आपल्या घरातूनच याची सुरुवात झाली पाहिजे, असेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

सैन्यदलात लेप्टनंट जनरल पदावर काम करणाऱ्या माधुरी कानिटकर यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

या चर्चेत सदस्य ॲड.मनिषा कायंदे, स्मिता वाघ, ॲड.हुस्नबानो खलिफे यांनी सहभाग घेतला.