मंत्रालय परिसरात अत्याधुनिक दर्जाच्या स्वच्छतागृहांचा आराखडा सादर करा – पालकमंत्री अस्लम शेख यांचे निर्देश

मुंबई, दि. 5 : राज्यभरातून दररोज मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांसाठी मंत्रालयाच्या परिसरात अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याचा आराखडा येत्या सात दिवसात सादर करण्याचे निर्देश वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी येथे दिले.

सार्वजनिक बांधकाम विभाग व मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत श्री. शेख यांनी हे निर्देश दिले.

मंत्रालयात राज्यभरातून दररोज सुमारे तीन ते चार हजार नागरिक विविध कामांसाठी येत असतात. त्यांना मंत्रालयाच्या आवारात दुपारी दोन वाजेनंतर प्रवेश देण्यात येतो. मात्र, हे नागरिक इतर गावाहून सकाळीच मंत्रालय परिसरात येतात. यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने असतात. मात्र, या नागरिकांसाठी मंत्रालयाच्या बाहेर स्वच्छतागृहांची कोणतीही चांगली व्यवस्था नाही. त्यामुळे या नागरिकांचे विशेषतः महिलांची अडचण होते. मंत्रालयात येणारी गर्दी पाहता मंत्री अस्लम शेख यांनी शौचालयासंदर्भातील अडचण जाणून घेतली आणि तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

मंत्रालय परिसरातच शौचालय बांधल्यास मंत्रालयात आलेल्या नागरिकांची सोय होईल. विशेषतः महिला अभ्यागतांची गैरसोय दूर होईल. त्यासाठी अत्याधुनिक दर्जाचे शौचालय उभारण्यासाठी जागा शोधावी व त्यासंबंधीचा आराखडा सात दिवसात सादर करावा. यासाठी आवश्यक निधीची तरतूद तातडीने करण्यात येईल, अशा सूचना यावेळी श्री. शेख यांनी दिल्या

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य वास्तू रचनाकार संजय गेडाम, कार्यकारी अभियंता संजय इंदुलकर, जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर आदी यावेळी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/5.3.2020