विधानपरिषद इतर कामकाज

रासायनिक कारखान्यांची तपासणी करणार

कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई, दि. 5 : डोंबिवली व पालघर येथे झालेल्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी जिल्हास्तरिय समिती गठित करून राज्यातील सर्व रासायनिक कारखान्यांची तपासणी करणार असल्याची माहिती कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

डोंबिवली एमआयडीसी  येथील फेज2 मधील मेट्रोपोलिटन एक्सिम लि. या कंपनीला दि. 18 फेब्रुवारी 2020 रोजी लागलेल्या आगीबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात 93 अन्वये सूचनेचे निवेदन केले होते. त्यावर उत्तर देताना श्री. वळसे-पाटील बोलत होते.

००००

राज्यातील होमगार्डचे प्रश्न मार्गी लावणार

गृहराज्यमंत्री सतेज पाटील

मुंबई, दि. 5 : पोलीस यंत्रणेतील महत्त्वाचा भाग असलेल्या होमगार्डचा प्रश्न शासन सकारात्मकतेने सोडविणार असल्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यातील होमगार्डच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य सदाभाऊ खोत यांनी या संदर्भात93 अन्वये सूचनेचे निवेदन केले होते. त्यावर उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, होमगार्ड यांना वर्षाचे 180 दिवस तरी काम मिळावे यासाठी मागणी आहे. निवडणूक, दहावी बारावीची परीक्षा, त्याचप्रमाणे महानगरपालिकांच्या निवडणुका यावेळी होमगार्डची सेवा मोठ्या प्रमाणात घेतली जाते. यासाठी लागणारा निधी हा निवडणूक खर्चातून तसेच महानगरपालिकांच्या माध्यमातून दिला जावा, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

निर्भया फंडातील निधीचा विनियोग महिला होमगार्डसाठी करता येईल का,  हे तपासून पाहावे असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी यावेळी दिले.

००००

समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षकांना

सातवा वेतन आयोग लागू करण्याची शिफारस

– सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

मुंबई, दि. 5 : राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत येत असलेल्या अनुदानित49 समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांना 7 वा वेतन लागू व्हावा यासाठी शासन सकारात्मक असून तशी शिफारस वित्त विभागाकडे करण्यात आली आहे. यामुळे शासनावर 16 कोटी 75 लाख एवढा अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री  डॉ. विश्वजीत कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य नागो गाणार यांनी यासंदर्भात93 अन्वये सूचनेचे निवेदन केले होते. त्यावर उत्तर देताना श्री. कदम बोलत होते.

००००

विसंअ/ अर्चना शंभरकर/5-3-20/ विधानपरिषद