जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, दि. 5 : जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दि. 6 मार्च, 2020 रोजी दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पोषण पंधरवड्याचा शुभारंभ तसेच पोषण अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमास महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महिला व बाल विकास विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोषण पंधरवडा दि.8 ते दि. 22 मार्च, 2020 या कालावधीत संपूर्ण राज्यभरात साजरा केला जाणार आहे. पोषण पंधरवडा दरम्यान ‘पूर्ण पोषण’ या संकल्पनेवर भर देण्यात आलेला असून त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
2018-19 या आर्थिक वर्षापासून राज्यात पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे यापूर्वीच केंद्र शासनामार्फत राज्याचा गौरव करण्यात आलेला आहे. पोषण अभियानांतर्गत विविध उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हे, प्रकल्प, मुख्यसेविका व अंगणवाडी सेविका यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी दिली आहे.
००००
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.6.3.2020