विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
6

रायगड जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहाराची आयुक्तांमार्फत चौकशी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. 5 : मौजे वाघोशी, ता. सुधागड, जि. रायगड येथील जमिनी खरेदी करताना झालेल्या अनियमिततेची औरंगाबाद आयुक्तांमार्फत चौकशी करून येत्या 31 मेपर्यंत कारवाई पूर्ण केली जाईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

मौजे वाघोशी, ता. सुधागड, जि. रायगड येथील जमिनी जितेंद्र तातेड व त्यांच्या कुटुंबियांनी खरेदी करताना शेतकरी असल्याचा दाखला पुरावा म्हणून सादर केला होता. या दाखल्याची सत्यता पडताळणी केली असता हे कुटुंब शेतकरी नाही असे प्रथमदर्शनी  लक्षात आले आहे.  या कुटुंबियांकडून या जमिनी दुसऱ्या संस्थेने विकत घेतल्या होत्या. या सर्व व्यवहारात अनियमितता झाल्याचे सकृतदर्शनी लक्षात आले आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी आधी कोकण विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश  दिले होते. मात्र पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी सदस्यांनी मागणी केल्यानंतर औरंगाबाद आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे श्री. थोरात यांनी मान्य केले.

या विषयावरील प्रश्न सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य सर्वश्री नागो गाणार, भाई जगताप, विनायक मेटे, जयंत पाटील, प्रवीण दरेकर, अमरेंद्र राजूरकर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग नोंदविला.

००००

अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 5 : राज्यातील अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी राज्य शासन कडक उपाययोजना करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री. देशमुख म्हणाले, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या कार्यक्षेत्रात हरियाणा व राजस्थानमधील तीन व्यक्तींना रत्नागिरी  एमआयडीसी येथील पडक्या इमारतीमध्ये कोकेन जवळ  बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र त्यांनी बाळगलेला माल हा अंमली पदार्थ नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिल्याने त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणाची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल. अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. सन 2019 मध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष व मुंबई पोलिसांनी एकूण 11 हजार 706 गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत असे सांगून  विविध ठिकाणी अंमली पदार्थांच्या विरोधात केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री आर्कि. अनंत गाडगीळ, भाई जगताप, डॉ. रणजीत देशमुख, हेमंत टकले, महादेव जानकर, सुरेश धस, श्रीमती हुस्नबानो खलिफे आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

कल्याण बाजारपेठ येथे नवीन पोलीस स्टेशन बांधणार

गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 5 : ठाणे जिल्ह्यातील कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनची नवी इमारत बांधणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांना पोलीस गृहनिर्माणासाठी यावर्षी अतिरिक्त300 कोटींच्या निधीची मान्यता मिळाली असल्याने राज्यात अधिकाधिक सुसज्ज अशी पोलिस स्थानके बांधण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

सदस्य सर्वश्री जगन्नाथ शिंदे, हेमंत टकले, विक्रम गायकवाड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

००००

मासेमारी बंदच्या कालावधीत बचत व सवलत योजनेचा लाभमत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख

मुंबई, दि. 5 : राज्यात मासेमारी बंदी कालावधीत बचत व सवलत योजनेंतर्गत नोंदणीकृत मच्छीमारांना तीन समान हप्त्यात लाभ देण्यात येतो, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

राज्यातील मच्छीमारांच्या समस्यांबद्दल सदस्य रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना ते बोलत होते.

श्री. शेख म्हणाले, राज्यात मत्स्यदुष्काळ जाहीर करण्यासंबधी मागणी होते आहे. याबाबत सविस्तर अभ्यास करून त्याबाबतचे निकष ठरवून येत्या चार महिन्यात निर्णय घेण्यात येईल. केंद्र शासनाच्या 2015-16 ला सुरु झालेल्या  नीलक्रांती या योजनेचे हे शेवटचे वर्ष आहे. येत्या एक महिन्यात दुसरी योजना जाहीर होईल त्यानंतर याबाबतचे निकष ठरवू.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, महादेव जानकर, अनिकेत तटकरे आदींनी सहभाग घेतला होता.

००००

विसअ/ अर्चना शंभरकर/5-3-20/ विधान परिषद प्रश्नोत्तरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here