सदोष वीज मीटरमुळे ग्राहकांवर बिलाचा भुर्दंड पडणार नाही – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई, दि. 5 : सदोष वीज मीटरमुळे ग्राहकांवर बिलाचा भुर्दंड पडणार नाही. सदोष वीज मीटरची निर्मिती करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकले असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विधानसभेत दिली.
सदस्य सुनील राऊत यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, राज्यात सिंगल फेजसाठी वीस लाख मीटर आवश्यक असून त्यातील दहा लाख नवीन जोडणीसाठी वापरली जातात. या सर्व मीटर्सची खरेदी ई-निविदा प्रक्रियेद्वारे केली जाते.
रोलेक्स कंपनीने पुरवठा केलेल्या दहा लाख मीटर्सपैकी 4 लाख 30 हजार 902 मीटर्स सदोष आढळून आले आहेत. या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. सदोष मीटरचा परिणाम वीज बिल दरवाढीवर होणार नसून ग्राहकांनाही त्याचा बोजा पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री योगेश सागर, सुनील प्रभु, आशिष शेलार, दिपक चव्हाण, हरिभाऊ बागडे, प्रकाश सोळंके, भास्कर जाधव यांनी सहभाग घेतला.
000
पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास संकुल उभारणार
– आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी
मुंबई, दि. 5 : पालघर जिल्ह्यातील लोणीपाडा येथे आदिवासी विकास संकुल पर्यायी जागेवर उभारण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य विनोद निकोले यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री ॲड.पाडवी म्हणाले, लोणीपाडा येथील वनविभागाची जमीन या संकुलासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र उपवन संरक्षण डहाणू यांनी जमीन देण्यास नकार दिल्याने वनविभागाच्या जमिनीऐवजी अन्य जमीन घेऊन संकुल उभारले जाईल, असेही श्री. पाडवी यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री धर्मराव बाबा अत्राम, भास्कर जाधव, श्रीमती मनिषा चौधरी यांनी भाग घेतला.
००००
सारंगवाडी साठवण तलावासाठी भूसंपादन झालेल्या
शेतकऱ्यांना तीन महिन्यात मोबदला देणार
– महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. 5 : बुलढाणा जिल्ह्यातील सारंगवाडी साठवण तलावासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तीन महिन्यात मोबदला दिला जाईल, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य संजय रायमुलकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
००००
अजय जाधव/वि.सं.अ./5/3/2020