विधानपरिषद लक्षवेधी

धोरण निश्चितीनंतर नवीन जिल्हा निर्मितीचा निर्णय

– महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. 5 : जिल्हा निर्मिती ही एक मोठी आर्थिक व प्रशासकीय प्रक्रिया असून अत्यंत क्लिष्ट व खर्चिक बाब आहे. त्यामुळे विविध पैलू तपासून धोरण निश्चित झाल्यानंतर नवीन जिल्हा निर्मितीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य डॉ.  वजाहत मिर्झा यांनी पुसद जिल्ह्याची निर्मिती करण्याविषयीची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. थोरात बोलत होते. विदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याची पुसद जिल्ह्यामध्ये निर्मिती व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची निवेदने विविध माध्यमातून प्राप्त झाली आहेत. राज्यातील अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन/पुनर्रचना करण्यासाठी राज्यस्तरावर निकष ठरवून शासनास शिफारशी करण्यासाठी अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली  समिती नियुक्ती करण्यात आली होती. या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे.  जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्याविषयी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने धोरण ठरवून नवीन जिल्हा निर्मितीचा निर्णय घेण्यात येईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत सांगितले.

लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री निलय नाईक, महादेव जानकर, विनायक मेटे यांनी सहभाग घेतला.

००००

तालुकास्तरावर डायलिसिस उपचार पद्धती सुरू करणार; 

पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यांचा समावेश – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 5: राज्यभरातील रुग्णांची गरज लक्षात घेता राज्यातील सर्व जिल्ह्यात डायलिसिस उपचारपद्धती सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात तालुकास्तरावरील रुग्णालयात डायलिसिस उपचार पद्धती आणि सीटी स्कॅन मशीन देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य विद्या चव्हाण यांनी राज्यातील आरोग्यविषयक समस्येविषयीची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. टोपे बोलत होते.

राज्यातील डायलिसिसच्या उपचाराची गरज लक्षात घेता पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यात डायलिसिस उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यभरातील सर्वच तालुक्यात ती उपलब्ध केली जाणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले. राज्यात २३ जिल्ह्यांमध्ये सीटी स्कॅन मशीन उपलब्ध असून त्यामार्फत रुग्णांचे निदान केले जाते. उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्या टप्प्याने सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील सर्व  उपजिल्हा रुग्णालयात  सीटी स्कॅन मशीन देण्याचा प्रयत्न आहे. ५० ते १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय असावे असा निकष यासाठी असणार आहे.  कर्करोगावर उपचार करण्यासाठी राज्यात अकरा जिल्हा रुग्णालयामध्ये केमोथेरपी युनिटची स्थापना करण्यात आली असून त्याठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मोफत उपचार दिला जात असल्याचे श्री. टोपे यांनी लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान सांगितले.

लक्षवेधीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, हुस्नबानो खलिफे, निरंजन डावखरे यांनी भाग घेतला.

००००

प्राध्यापकांच्या वेतनप्रश्नी विधी व न्याय आणि

वित्त विभागाशी चर्चेअंती कार्यवाही – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 5: सन २०१३ मध्ये राज्यातील प्राध्यापकांनी परीक्षांवर घातलेल्या बहिष्काराच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालायाने निर्णय दिला आहे. या निर्णयाचा आदर ठेवून वित्त आणि विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषेदत सांगितले.

सदस्य दत्तात्रय सावंत यांनी २०१३ मध्ये परीक्षांवर घातलेल्या बहिष्कारानंतर प्राध्यापकांना न दिलेल्या वेतनासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. सामंत बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील अकृषि विद्यापीठे व संलग्नित  महाविद्यालयातील अध्यापकांनी विविध मागण्यांच्या अनुषंगाने ४ फेब्रुवारी ते १० मे २०१३ या कालावधीत परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर काम नाही, वेतन नाही या तत्त्वानुसार प्राध्यापकांनाया कालावधीतील वेतन देण्यात आले नव्हते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. या निर्णयाचा आदर ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने वित्त आणि विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत प्रा. अनिल सोले, नागो गाणार, श्रीकांत देशपांडे, ॲड. मनिषा कायंदे, कपिल पाटील, निरंजन डावखरे, प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भाग घेतला.

००००

राज्यातील बेकायदा पॅथॅालॉजींविरोधात कठोर कारवाई

– वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 5 :  राज्यातील बेकायदा पॅथॉलॉजींविरोधात आरोग्य विभागाच्या मदतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाशी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी राज्यातील बेकायदा पॅथॅालॉजीविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते.

क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट महाराष्ट्रात अद्याप लागू करण्यात आलेला नाही. हा कायदा राज्यात लागू करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे. बेकायदा लॅब प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय  आयुक्त यांना निर्देश दिले असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य विजय उर्फ भाई गिरकर आदींनी सहभाग घेतला.

००००

राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न 

पर्यावरणमंत्री  आदित्य ठाकरे

मुंबई, दि. 5 : राज्यातील नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यातील 21नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव नीति आयोगाकडे पाठविण्यात आला असल्याचे पर्यावरणमंत्री  आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य गिरीशचंद्र व्यास यांनी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या प्रदूषणाविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. ठाकरे बोलत होते. नद्यांच्या पुनरुज्जीवित करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत आहे. वैनगंगा नदीच्या दूषित पाण्यामुळे बाधित नदीकाठच्या गावास शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून परिसरातील ४५ गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ३१ गावात जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. उर्वरित १३ गावांसाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. वैनगंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भात या भागाचा दैारा करण्यात येणार आहे. यासंदर्भात एक बैठकही घेण्यातयेणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री डॉ.परिणय फुके, रामदास आंबटकर यांनी भाग घेतला.

००००

अतुल पांडे / दि. 5/3/2020