मुंबई, दि. 2 : सांगली जिल्ह्यातील तुंग चोपडेवाडी पुलाचे राहिलेले काम तातडीने पूर्ण करावे. ज्यामुळे त्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले.
सांगली जिल्ह्यातील विविध पूल तसेच शहरातील आयर्विन पुलाला पर्यायी पूल बांधणे, शहरात बिकट होत असलेल्या वाहतुकीचा प्रश्न याबाबत आज राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, आमदार सुधीर गाडगीळ व संबंधित विभागाच्या विधिमंडळातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत, हरिपूर कातळी पूल तसेच कुपवाड ड्रेनेज योजनेबाबत सविस्तर चर्चा झाली.
कुपवाड शहरातील भुयारी गटार योजनेसंदर्भात चर्चेदरम्यान एसटीपीसाठी आवश्यक ती जागा व जागा मालकाचे प्राथमिक संमतीपत्र प्राप्त असल्याचे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. या योजनेत कुपवाड गावठाण, वानलेसवाडी, शासकीय वसाहत, लक्ष्मी देऊळ ते कुपवाड, वारनाली, अष्टविनायक नगर, विजय नगर हा भाग समाविष्ट होता. यात आहिल्यानगर, पालवी हॉटेल परिसर, बेथलहेम नगर, तुळूनाडू भवन परिसर हा भाग नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. वाहिन्यांची लांबी 225 किमी असून 180 कोटी अंदाजित खर्च आहे. शासनाच्या नगरोत्थान योनजेंतर्गत ही योजना साकारण्यात येईल. तसेच पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे 2037 च्या लोकसंख्येला धरुन ही योजना आखण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
सदरील योजना तातडीने शासनाकडे सादर करावी, अशी सूचना श्री.पाटील यांनी यावेळी दिली. या बैठकीस व्यापारी एकता असोसिएशनचे पृथ्वीराज पाटील, संजय बजाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री. माने व अधीक्षक अभियंता श्री.राहाडे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००
डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर/विसंअ/2.3.2020