देशाला सर्वच क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचा स्टेट ऑफ द इयरपुरस्काराने सन्मान

मुंबई,  दि. २८ : देशाला सर्वच क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडेंट येथे सीएनबीसी टीव्ही18 इंडिया ने आयोजित केलेल्या इंडियन बिजनेस लीडर ॲवार्ड कार्यक्रमात श्री. ठाकरे बोलत होते.

या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याला‘स्टेट ऑफ द इयरपुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वीकारला.

या कार्यक्रमास पर्यटन, पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगपती मुकेश अंबानी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होतील परंतु हे स्वातंत्र्य तळागळातील लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. देशातील गरिबांच्या, सर्वसामान्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या तिनही मुलभूत गरजा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही हे पाहणे आपली जबाबदारी आहे. देशाला सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर ठेवायचे असेल तर उद्योगपती, कष्टकरी, माध्यमे आणि इतर सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. आज महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला आहे. तसा तो इतर राज्यांनाही मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उत्कृष्ट उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी, जीवनगौरव पुरस्कार दीपक पारेख, क्रीडा क्षेत्रात पुल्लेला गोपिचंद, उत्कृष्ट व्यवसाय क्षेत्रात एचडीएफसी बँक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.