विधानपरिषद लक्षवेधी

0
11

अर्थसंकल्पीय अधिवेशनातदिशाकायद्याच्या धर्तीवर कायदा मांडणारगृहमंत्री अनिल देशमुख

बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा

मुंबई,  दि. 26 : महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या दिशाकायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा तयार करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत हा कायदा बनविण्यासाठी विधेयक विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. या कायद्याअंतर्गत बलात्कार, सामूहिक बलात्कार, अल्पवयीन बालकांवरील अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले.

विधानपरिषद सदस्य हेमंत टकले तर विधानसभेत सुनिल प्रभू यांनी वर्धा जिल्ह्यातील प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळल्याच्या अनुषंगाने महिला सुरक्षेसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशात‘दिशाकायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याच्या धर्तीवर आवश्यक त्या सुधारणा करून महाराष्ट्रातही कायदा अस्तित्वात आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. देशमुख यांनी दोन्ही सभागृहात दिली.

या कायद्याचा अभ्यास व त्या अनुषंगाने राज्यात अंमलबजावणीसाठी पाच पोलिस अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल २९ फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे. या अहवालानंतर या कायद्यासंदर्भातील विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. महिलांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी शासन गंभीर असून, हा नवीन कायदा अस्तित्वात आणण्यापूर्वी दोन्ही सभागृहाच्या महिला सदस्य तसेच महिलांसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था यांच्या सूचनाही विचारात घेतल्या जाणार असल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

येत्या तीन महिन्यात राज्यभरातील1150 पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येकी सहा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना मनोधैर्य योजनेंतर्गत  अर्थसहाय्य देण्यात येते. येत्या काळात ज्वलनशील पदार्थांमुळे बळी पडलेल्यांना मदत करण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

महिला अत्याचार प्रतिबंध आणि समुपदेशनासंदर्भात पुणे पोलिसांमार्फत‘भरोसा सेलस्थापन करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या यशस्वितेनंतर राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तक्रारींच्या नोंदणीसाठी सीसीटीएनएस या प्रणालीद्वारे ऑनलाईन तक्रारींची सुविधा उपलब्ध करून  देण्यात आली असल्याचे श्री.देशमुख यांनी या लक्षवेधीवरील एका उपप्रश्नाला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितले.

मुंबईत सध्या पाच  हजार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असून आणखी पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. महिला सुरक्षेसाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त माध्यम ठरणार आहेत. राज्यातील नवीन तसेच जुन्या इमारतीत सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

लक्षवेधीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री  कपिल पाटील, गिरीश व्यास, नागो गाणार, प्रकाश गजभिये, हुस्नबानो खलिफे, निरंजन डावखरे, जोगेंद्र कवाडे, किशोर दराडे, रामदास आंबटकर, परिणय फुके, प्रसाद लाड, भाई गिरकर, अंबादास दानवे, श्रीमती ॲड. मनिषा कायंदे, विद्या चव्हाण यांनी तर विधानसभेत सदस्य सर्वश्री अबू आझमी, प्रणिती शिंदे, यामिनी जाधव, शुभ्रा घोडके यांनी सहभाग घेतला.

००००

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करणार

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 26 : राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी गत सरकारने केलेली महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत केली. सदस्य विलास पोतनीस यांनी या विषयावर उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

मंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान, गुणवत्तापूर्ण आणि आजच्या काळाशी समर्पक असे शिक्षण मिळावे ही राज्य शासनाची भूमिका आहे. राज्यातील सुमारे 83 शाळांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाली आहे. यात शैक्षणिक वर्ष 2018-19  मध्ये राज्यातील 13 जिल्हा परिषद शाळांना संलग्नता देण्यात आली तर शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये मराठी माध्यमाच्या शासन मान्यताप्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा , स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा 70 शाळांची निवड करण्यात आली. मात्र या सर्व प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्यासंदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या नव्या अभ्यासक्रमाची निश्चित रुपरेखाही तयार करण्यात आली नव्हती. या सर्व त्रुटी लक्षात घेता विद्यार्थ्यांचे हित अबाधित राखत संबधित शाळेतील अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच चालू ठेवून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. 

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत  सदस्य डॉ. रणजीत पाटील, डॉ. सुधीर तांबे, शरद रणपिसे, कपिल पाटील, प्रकाश गजभिये, निरंजन डावखरे, महादेव जानकर, भाई गिरकर यांनी सहभाग घेतला.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here