मराठी भाषा गौरव दिन : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २७ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
8

मुंबई,दि.25: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ गौरव व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेचा प्रवास दर्शविणारा आणि मराठी भाषेची सौंदर्यस्थळे मांडणारा दर्जेदार‘प्रवास आणि प्रवाह’हा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात येणार आहे.

गुरुवार दि.27फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह,नरिमन पाईंट येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मराठी भाषामंत्री सुभाष देसाई,वस्त्रोद्योग तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख,मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम,मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,खासदार अरविंद सावंत आणि आमदार राहुल नार्वेकर यांची विशेष उपस्थिती  राहणार आहे.

मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ व मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या प्रकाशन संस्थेस ‘श्री.पु.भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. निवड समितीने यावर्षीच्या ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी’ ज्येष्ठ साहित्यिका,श्रीमती अनुराधा पाटील यांची तसेच ‘श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशन,पुणे’ या संस्थेची निवड केली आहे.

मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस ‘भाषा संवर्धन पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कारासाठी अनुक्रमे प्रा.आर.विवेकानंद गोपाळ व श्री.अनिल गोरे यांची निवड करण्यात आली आहे. 

हे सर्व पुरस्कार या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत.  मराठी भाषा विभाग,राज्य मराठी विकास संस्था,महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि भाषा संचालनालय या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.                       

००००

विसंअ/अर्चना शंभरकर/मराठी भाषा गौरव दिन/25-02-2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here