विधानसभा प्रश्नोत्तरे

0
7

मच्छिमारांच्या विकासासाठी निधीची पूर्तता करणार

– अशोक चव्हाण

मुंबई, दि. 25 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मच्छिमारांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यातील आठ जेट्टीपैकी६जेट्टींची कामे पूर्ण झाली आहेत. मच्छिमारांच्या विकासात्मक कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व.उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य श्रीनिवास वनगा यांनी पालघर जिल्ह्यातील बंदराचा विकास आणि जेट्टींच्या कामांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री.चव्हाण बोलत होते.

श्री. चव्हाण म्हणाले,नाबार्ड आणि मत्स्य व्यवसाय विभागाने निधी उपलब्ध करून ८ पैकी ६ जेट्टींची कामे पूर्ण केली असून,उर्वरित दोन कामे स्थानिकांच्या विरोधामुळे अपूर्णावस्थेत आहेत. तसेच,मुंबईतील माहीम,उपनगरातील मढ,भाटी,मढ धोनीपाग या कामास  झालेल्या विलंबामुळे संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील बंदर आणि जेट्टींच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,उर्वरित अपूर्णावस्थेत असलेली कामे निविदा, अटी व शर्तीप्रमाणे करून घेण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.

००००

हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणाची

विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी – एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 25 : कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून खत तयार करणाऱ्या नागपूर येथील हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल,अशी माहिती  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

नागपूर येथील भांडेवाडी येथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहारासंदर्भात आमदार विकास ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना श्री.शिंदे बोलत होते.

श्री. शिंदे म्हणाले,हंजर कंपनीच्या व्यवहाराबाबत विधी व न्याय,सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष समितीमार्फत चौकशी सुरू आहे. तसेच या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे२ हजार ११५कोटी इतका दंड वसूल करण्यात आला आहे. याचबरोबर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासंदर्भात करारनामा करण्यात आला असून,लवकरच प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या संबंधित कंपनीने गैरव्यवहार केल्याचा आरोप असून,विभागीय आयुक्तांच्या स्तरावर चौकशी समिती नेमून,चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

००००

अजय जाधव/श्रद्धा मेश्राम/विसंअ/25.2.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here