कृषीविकासासाठी ‘लॅब ते लॅण्ड’ संकल्पनेवर भर

0
5

नाबार्डच्या वतीने आयोजित राज्य क्रेडिट सेमिनारमध्ये कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती मुंबई, दि. 20 : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी यांत्रिकीकरणात नाविन्यपूर्ण उपकरणांचा समावेश करणार असून ‘लॅब ते लॅण्ड’ अशा पद्धतीने कृषी क्षेत्राचा विकास करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे नाबार्ड बँकेच्यावतीने राज्य क्रेडिट सेमिनार आयोजित करण्यात आला. त्यावेळी कृषीमंत्री बोलत होते. यावेळी नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक यु.डी. शिरसाळकर, नाबार्डचे महाव्यवस्थापक एल.एल. रावल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, राज्याच्या कृषी व पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात नाबार्डचा मोठा वाटा आहे. बँकांकडून जसे शहरांच्या विकासाकडे लक्ष दिले जाते त्या पद्धतीने शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी अधिक प्रयत्न करावे. कृषी विभागाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष जमिनीवर कार्यान्वित करण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देताना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर अधिकाधिक केला जाणार असून त्या माध्यमातून योजनांच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणण्यात येणार आहे.

राज्यातील छोट्या शेतकऱ्यांना कर्ज मिळावे यासाठी बँकांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्याकरिता बँकांनी जास्तीत जास्त मदत करावी. ग्रामीण भागांमध्ये बँकांच्या शाखांचे जाळे वाढवावे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या देखील पुरेशी ठेवावी, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी हित केंद्रबिंदू ठेवून योजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ठिबक सिंचन, शेततळे, अस्तरीकरण या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये नाविन्यपूर्ण उपकरणांचा अंतर्भाव केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

अजय जाधव/विसंअ/20.2.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here