सक्षम समाज घडविण्यासाठी समर्थपणे कर्तव्य बजावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
9

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी सत्र क्रमांक117चा दीक्षान्त समारंभ संपन्न

 नाशिक दि.30 -सक्षम समाज घडविण्यासाठी समर्थपणे आपले कर्तव्य बजवावे. कठोर मेहनतीनंतर मिळालेल्या वर्दीला भ्रष्टाचारमुक्त ठेवत चारित्र्यावर कुठलाही कलंक लागू नये याची दक्षता घ्यावी,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केले.

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक सत्र क्र.117च्या दीक्षान्त संचलन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री एकनाथ शिंदे,पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालिका अश्वती दोरजे आदी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले,प्रशिक्षणानंतर प्रत्येक पोलीस उपनिरीक्षक आव्हाने स्वीकारण्यास आणि त्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशासोबत मिळालेली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी सदैव तत्पर राहून आपल्या वरिष्ठांनी आणि यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी करुन पोलीस दलाची मान उंचावली आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक ही कर्तव्य व सेवेची परंपरा नेतील,असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी  व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,वर्दीच्या आतला माणूस मजबूत करण्यासाठी पोलिसांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ व निरोगी राहणे आवश्यक आहे. यासाठी शासन आवश्यक ती सर्व मदत करेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दल सक्षम करण्यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञान,वाहने,प्रशिक्षण अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासनामार्फत प्रयत्न करण्यात येईल. संघटीत गुन्हेगारी,नक्षलवाद,सायबर गुन्हे अशा आव्हानांना पेलण्याची प्रेरणा मिळावी म्हणून पुढील वर्षी मानाच्या तलवारी सोबतच’मानाची रिव्हॉल्वर’हा पुरस्कार म्हणून देण्यात येईल,अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक117या  तुकडीचे प्रशिक्षण हे22ऑक्टोबर2018पासून सुरु झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील477पुरुष व192महिला व गोवा राज्यातील20पुरुष असे एकूण689प्रशिक्षणार्थींनी  प्रशिक्षण पूर्ण करुन ते आज पोलीस सेवेत रुजू होत आहेत. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही राज्यातील एकमेव संस्था असून1जुलै1906रोजी भांबुर्डा,पुणे येथे सुरु झालेली प्रशिक्षण शाळा1जुलै1909रोजी नाशिक येथे स्थलांतरित करण्यात आली असून5फेब्रुवारी1990रोजी या शाळेला महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती श्रीमती दोरजे यांनी यावेळी बोलताना दिली.  त्यांनी प्रशिक्षणार्थींना संविधानाची शपथ दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण संचलनाचे निरीक्षण केले.  संचलन सुरु करण्यापूर्वी राष्ट्रध्वज व महाराष्ट्र पोलीस प्रबोधनीच्या ध्वज घेऊन जाणाऱ्या निशाण टोळीला सर्व उपस्थितींना मानवंदना दिली.  संचलनाचे नेतृत्व संतोष कामटे आणि विजया पवार यांनी केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. संतोष कामटे यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी (‘स्वॉर्ड ऑफ ऑनर) व  बेस्ट कॅडेट इनडोर स्डडीज (सिल्व्हर बॅटन) ने सन्मानित करण्यात आले. अहिल्याबाई होळकर कप बेस्ट ऑल राऊंड वुमन कॅडेट व सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच विजया पवार,बेस्ट कॅडेट इन आऊट डोअर (गोल्ड कप) सागर साबळे यांना प्रदान करण्यात आला.

दीक्षान्त संचालनानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते इनडोअर फायरिंग रेंज,ॲस्ट्रोअर्फ हॉकी व फुटबॉल मैदान तसेच आवेल मैदानातील सिन्थेटिक ट्रॅकचे भूमिपूजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here