आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळण्याबाबत आढावा बैठक संपन्न

नागपूर,दि. 20 : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळणेबाबत आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आढावा बैठक झाली.

अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजना,ममदापूर लघुसिंचन तलावात शीर्षकामे,नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित योजना व योजनेतील उपांगे तसेच अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे अंदाजित 28 कि. मी. दूरुन पाणी येत असल्याने पाण्यात दुर्गंधीयुक्त सडलेले जीव तसेच पालापाचोळा येत असल्याने आष्टी शहराला दूषित पाणी पुरवठा होत होता. या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून आरसीसी पाईपलाईन टाकून त्या ठिकाणी जाळी बसून शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करणेबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळावी याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये ही योजना त्वरीत पूर्ण करावी,असे निर्देश श्री.पटोले यानी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूरचे मुख्य अभियंता सतिश सुशीर,अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धाचे कार्यकारी अभियंता दीपक वाघ,वर्धा जिल्ह्याचे पाटबंधारे उपविभागीय अभियंता श.अ.भोगले,आष्टी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत आदी उपस्थित होते.