शून्य मैल दगडाची वेगळी गोष्ट! (विशेष वृत्त)

1
5

नागपूर,दि 17 : महाराष्ट्राची उपराजधानी,संत्र्यांचे शहर अशी विविध वैशिष्ट्ये सांगणाऱ्या नागपूर शहराची ओळख ठळक केली जाते ती शून्य मैलाच्या दगडाने.अर्थातच झिरो माईल्स स्टोनमुळे.  1907 मधील हा दगड नागपूरचे भौगोलिक स्थान ठळक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या  शून्य मैलाच्या शेजारीच असलेला जीटीएस दगड हा तत्कालीन विशाल त्रिकोणमितीय सर्वेक्षणाचा एक साक्षीदार म्हणून आजही उभा आहे. ब्रिटिशकालीन सर्वेक्षणावेळी संपूर्ण देशभरात असे साधारणत: 80 शून्य मैलाचे दगड उभारले गेले असले तरी देशाचा मध्य म्हणून नागपूरच्या शून्य मैलाच्या दगडाचे वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे.

देश चालविण्यासाठी महसूल गोळा करणे आवश्यक असते. त्यामुळे महसूल गोळा करण्यास सुविधा निर्माण व्हावी यासाठी आणि स्थल व उंच-सखलपणा दाखवणारे नकाशे अचूक सर्वेक्षण करून बनवण्याच्या मुख्य उद्देशाने जीटीएस हा प्रकल्प राबविण्यास  19 व्या शतकाच्या प्रारंभीच सुरुवात झाली. कालांतराने इस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटीश राजवटीत ते सर्वेक्षण पूर्ण झाले. सध्या नागपुरात झिरो माईल्स च्या शेजारी असलेल्या जीटीएस या दगडावरही त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची फुटामध्ये 1020.171 अशी कोरण्यात आली आहे. आपल्या साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे आणि त्यातून आपले राज्य बळकट करणे हा जरी ब्रिटिशांचा या सर्वेक्षणामागे उद्देश असला;तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. या सर्वेक्षणाच्या माध्यमातूनच त्यांनी एव्हरेस्ट,कांचनगंगा,के.टू यांसारख्या शिखरांची उंची निश्चित केली होती.

नागपूरमध्ये असलेल्या शून्य मैलाच्या दगडाच्या माध्यमातूनही त्याच्या चारही बाजूला असलेल्या कवठा,हैदराबाद,चंदा,राजपूर,जबलपूर,सीओनी,छिंदवाडा,बैतुल शहरांची अंतरे दर्शविली आहेत.  सध्या  हा दगड आपल्या ऐतिहासिक खुणा घेऊन उभा आहे.  या ठिकाणी असलेले चार घोड्यांचे शिल्प या स्मारकाच्या सौंदर्यात भर घालते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here