कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु

मुंबई, दि. 6, राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी-विक्रीची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही  सुरू ठेवण्यात येणार आहेत.

बाजारपेठेत शेतमालाची घटलेली आवक पाहता कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.  अशा परिस्थितीत सुटट्यांमुळे बाजार समित्यांचे व्यवहार बंद राहिल्यास ग्राहक आणि शेतकरी यांची गैरसोय होऊ शकते म्हणून शेतकऱ्यांना कांदा, बटाटा, टोमॅटो सुट्टीच्या दिवशीही बाजार समितामध्ये घेऊन येता यावे यासाठी सुट्टीदिवशीही बाजारसमित्यांचे व्यवहार सुरू राहणार आहेत. 

ज्या जिल्ह्यामंध्ये कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतमालाचे उत्पादन आणि आवक जास्त आहे अशा जिल्हयातील सर्व बाजार समित्यांनी आणि विशेषतः नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे व मुंबई या जिल्ह्यातील बाजार समित्यांनी शासकीय, सार्वजनिक आणि बाजार समित्यांच्या साप्ताहिक सुटट्यांच्या दिवशीही बाजार आवारे चालू ठेवावीत आणि शेतमाल उत्पादक शेतकरी/ व्यापारी आणि ग्राहक यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. असे पणन संचालनालयाच्या वतीने बाजार समित्यांना परिपत्रकाद्वारे कळविले आहे.