मुंबई, दि. 29 : राज्य शासनाचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकास कामे होणार नाहीत. त्यामुळे आरेमधील मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून या कामाचा पूर्णपणे आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. आमदार आदित्य ठाकरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यावेळी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी मुख्यमंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी मुख्यमंत्र्यांचे तर कार्यवाह विवेक भावसार यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांपासून पत्रकार संघाशी जे ऋणानुबंध आहेत, माझ्यापासून ते अजून दृढ होत आहेत, याचा आनंद आहे. शासन चालविण्याचे आव्हान मोठे असून महागाई, टंचाई, भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना करायचा आहे. पत्रकारांची टीका सकारात्मक हवी. त्यासाठी पत्रकारांनी या शासनाचे कान, नाक, डोळे होऊन सरकारच्या घोषणांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनासोबत यावे. तसेच हे काम करणारे सरकार असून या शासनाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी पत्रकारांनी विधायक सूचना करुन सहकार्य करावे, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.
हे आपल्या सगळ्यांचे सरकार आहे. जनतेच्या पैशातून विविध योजनांवर खर्च केला जातो. त्यामुळे योजनांवर खर्च करताना हा करदात्याचा पैसा आहे, हे लक्षात ठेवून उधळपट्टी होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचना आज झालेल्या सचिवांबरोबरच्या बैठकीत केल्या आहेत. आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्या कामाचा आढावा घेतला जाईल. पुढील निर्णय होईपर्यंत तेथे वृक्षतोडीस स्थगिती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
मी मुंबईत जन्मलेला पहिलाच मुख्यमंत्री असल्यामुळे मुंबईसाठी काय करता येईल, याचा विचार सुरू आहे. मात्र, त्याबरोबरच राज्यातील इतर शहरांसाठीही कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दलही विचार करत आहे. शेतकऱ्यांसाठीही निर्णय घेण्याची घोषणा केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी प्रास्ताविकात संघाच्या परंपरेची माहिती देऊन, राज्याच्या विकासात पत्रकारांनी सहकार्य करावे, या मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या आवाहनानुसार सर्व पत्रकार सहकार्य करतील, असे सांगितले.
मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे उपाध्यक्ष दीपक भातुसे, कोषाध्यक्ष महेश पावस्कर आदी यावेळी उपस्थित होते.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/29.11.2019