शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी समारंभात
सहा कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ
मुंबई, दि. 28 : राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासमवेत एकनाथ संभाजी शिंदे, सुभाष राजाराम देसाई, जयंत राजाराम पाटील, छगन चंद्रकांत भुजबळ, विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, नितीन काशिनाथ राऊत यांनी राज्यपालांकडून मंत्रीपदासाठी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.
आजच्या शपथविधी कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार शरद पवार, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. कमलनाथ, माजी मुख्यमंत्री सर्वश्री देवेंद्र फडणवीस, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, खासदार श्रीमती सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,तामिळनाडूचे माजी उप मुख्यमंत्री एम.के. स्टालिन, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, देशभरातून विशेष निमंत्रित करण्यात आलेले सर्व क्षेत्रातील सन्माननीय अतिथी उपस्थित होते.
शपथविधीची क्षणचित्रे
- आजच्या शपथविधी कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदान गर्दीने फुलले होते.
- महाराष्ट्र गीत आणि शिव पोवाड्याने शिवाजी पार्क मैदानातील वातावरण चैतन्यदायी झाले होते.
- शपथविधी सोहळ्यासाठी शेतकरी आणि वारकरी यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांची उपस्थितीही लक्ष वेधून घेत होती.
- सांगली येथील संजय सावंत आणि रुपाली सावंत या वारकरी दाम्पत्याने मंचावर येऊन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.