मुंबई दि. 23 : आज देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे 28व्या मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दिली. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोघेही परिश्रमपूर्वक कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, त्यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा वाटचाल सुरू करणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
परिचय
नाव: श्री. देवेंद्र फडणवीस
जन्म दिनांक: २२ जुलै १९७०.
वय: ४९
आई-वडिलांचे नाव: श्रीमती सरिता आणि स्व.श्री गंगाधरराव फडणवीस
पत्नी: श्रीमती अमृता
सुपुत्री: कु. दिविजा
शिक्षण: श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून विशेष गुणवत्तेसह कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पदवीनंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळविली. त्यांनी डीएसई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.
परिचय
महाराष्ट्राचे २८वे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी व डी. एस. ई. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती व तंत्र या विषयात पदविका मिळविली. नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला.
श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (१९९२ व १९९७) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौर पदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच.
देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपिठांनी गौरविलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिवपदी ते कार्यरत आहेत.
लोक प्रतिनिधित्व
· २०१४ ते २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
· १९९९ ते आतापर्यंत – सलग पाचवेळा महाराष्ट्र विधानसभा सदस्य
· १९९२ ते २००१ – सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर, मेयर इन कॉन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव
राजकीय टप्पे
· २०१३ – अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
· २०१० – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
· २००१ – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
· १९९४ – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
· १९९२ – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
· १९९० – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
· १९८९ – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो
विधिमंडळातील कार्य
अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती
सामाजिक योगदान
· सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन
· नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्यांबाबत रिसोर्स पर्सन
· संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
· नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष
· नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
· राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य
आंतरराष्ट्रीय ठसा
· १९९९ मध्ये होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण
· २००५ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स
· २००६ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी – युनेस्को – डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
· चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ – ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन – इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण
· २००७ मध्ये डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व
· २००८ मध्ये अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट – वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर
· २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य
· २०१० मध्ये मॉस्को येथे भेट देणाऱ्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य
· २०११ मध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग,
· २०१२ मध्ये मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग
· २०१२ मध्ये केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य
पुरस्कार
· कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशन २००२-२००३चा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
· राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार
· रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार
· मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
मुख्यमंत्री कार्यकाळातील परदेश दौरे
– २१ ते २५ जानेवारी २०१५ आणि २१ ते १५ जानेवारी २०१८- दावोस (स्वित्झर्लंड)- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी.
– १२ ते १६ एप्रिल २०१५- जर्मनी- हॅनोव्हर मेसी परिषदेसाठी.
– २६ ते २९ एप्रिल २०१५- इस्राईल
– १४ ते १८ मे २०१५- चीन
– २९ जून ते ६ जुलै २०१५ आणि 19 ते 22 सप्टेंबर २०१६- अमेरिका.
– ८ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१५- जपान
– १२ ते १६ नोव्हेंबर २०१५- लंडन
– ९ ते १४ जुलै २०१६- रशिया.
– २६ ते २९ सप्टेंबर २०१७- दक्षिण कोरिया-सिंगापूर.
– ११ ते १४ ऑक्टोबर २०१७- स्वीडन- स्वीडन एक्स्पोसाठी.
– ९ ते १६ जून २०१८- दुबई, कॅनडा, अमेरिका
माहिती संदर्भ – https://www.maharashtra.gov.in/
000
नाव : श्री. अजित अनंतराव पवार
जन्म : 22 जुलै 1959.
जन्म ठिकाण : देवळाली–प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.
शिक्षण : बी. कॉम.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा
अपत्ये : एकूण 2 (दोन मुले)
व्यवसाय : शेती
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मतदारसंघ : 201 बारामती, जिल्हा पुणे.
इतर माहिती : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि., भवानीनगर, माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि., जिल्हा पुणे; संचालक, महाराष्ट्रराज्य सहकारी संघ, मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे; मार्च 1991 ते ऑगस्ट 1991 तसेच डिसेंबर 1994 ते डिसेंबर 1998 अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक; 11 डिसेंबर 1998 ते 17 ऑक्टोबर 1999 अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई; 19 डिसेंबर 2005 पासून संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक संघः 28 सप्टेंबर 2006 पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ; सप्टेंबर 2005 ते 23 मार्च 2013; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन; 13 ऑगस्ट 2006 पासून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशन; 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 सदस्य, लोकसभा; 1991-95 (पो.नि.) 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 28 जून 1991 ते नोव्हेंबर 1992 कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री; 27 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; 26 डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री; 9 नोव्हेंबर 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 जलसंपदा ( कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून ) व ऊर्जा खात्याचे मंत्री; 11 नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा);
ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; 23 नोव्हेंबर, 2019 पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री.
(संदर्भ 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)
00000