उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
9

पहिले‘नॉर्थइस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल अवॉर्डप्रदान

मुंबई, दि. 15 : देशाच्या पूर्वोत्तर राज्यातील दुर्लक्षित मात्र उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा कार्यक्रमांचा प्रसार करुन  सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यातून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यास मदत होईल, अशी भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.

यूएफओच्या संयुक्त विद्यमाने फाईंड स्टुडिओज आणि एसआयईएलद्वारा आयोजित बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे आयोजित पहिल्या‘नॉर्थइस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल अवॉर्डकार्यक्रमात श्री.कोश्यारी बोलत होते.

आंतरराज्यीय जीवनपद्धतीचे कौतुक करत राज्यपाल म्हणाले, सामाजिक जीवनात चांगले काम करणाऱ्यांकडे अनेकवेळा दुर्लक्ष होते. मात्र त्यांना पुरस्काराने सन्मानित करुन प्रोत्साहन देण्याचे कार्य सामाजिक संस्थांकडून केले जात असून अशा कार्यक्रमांचा प्रसार अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करेल अशी अपेक्षा आहे. देशाला एकत्रित ठेवण्यात विविध राज्यांतील व्यक्तींचे योगदान लाभले आहे. आपला देश उत्तम संस्कृती लाभलेला देश आहे. देशाच्या सर्वच प्रदेशातील नागरिकांमध्ये एकतेची भावना दरवळत असते. हा देश आणि आपण सर्व एक आहोत अशी भावना रुजविणे महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या राज्यातील जीवनपद्धती, संस्कृतीचे आदान-प्रदान यातून एकता निर्माण होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आज सन्मानित झालेल्या व्यक्तींनी एवढ्यातच संतुष्ट न राहता राष्ट्रीय पातळीवर कौतुक व्हावे असे कार्य करावे. तसेच देशाला एकात्मतेचा संदेश देण्यात सर्वांनी योगदान द्यावे. याचबरोबर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी ईशान्येकडील राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पन्नाच्या किमान एक टक्का अर्थसहाय्य करावे, असेही आवाहन श्री.कोश्यारी यांनी यावेळी केले.

ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय या आठ राज्यातील प्रत्येकी तीन व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्कारांसाठी एकूण 65 अर्ज प्राप्त झाले होते. कला व संस्कृती, नवउद्योजक आणि क्रीडा क्षेत्रातील रोझ लाँगचर, टोई स्वुउरो, मेन्होडिल्हो मोरीस उसो यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एसईआयएलचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटक सचिव सुनिल अंबेकर, आशिषकुमार चौहान, संस्थापक रेबेका चंकेजा सीमा आणि पुरस्कारर्थी आदी उपस्थित होते. या उपक्रमाला मुंबई डबेवाला संघटनेने पाठिंबा दर्शविला असून मुंबई विद्यापीठ आणि आयआयएम, शिलाँग या संस्था भागीदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here