अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

0
7

मुंबई, दि. 4 : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देऊन 6 नोव्हेंबरपर्यंत मिशन मोडमध्ये ते पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज येथे दिले.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जिल्हानिहाय कृषीक्षेत्राचे किती नुकसान झाले याची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक होतील याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच्या वाटपासाठी पंचनामे वेळेत होणे आवश्यक असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देताना मुख्य सचिव म्हणाले, सर्व पंचनामे दि. 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थिती आल्यास 8 नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण झाले पाहिजे. पंचनामे करताना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि ज्या ठिकाणी कृषी विद्यापीठे आहेत तेथील कर्मचाऱ्यांचीही त्यासाठी मदत घ्यावी, असे स्पष्ट करतानाच सर्व पंचनामे विभागीय आयुक्तांनी अंतिम करून ते कृषी आयुक्तांकडे पाठवावेत. पंचनाम्यासाठी विमा कंपन्यांनीही आवश्यक ती मदत करावी, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.

पाऊस झाल्याने रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी लगबग करतील त्यासाठी बी-बियाणे, खते यांची टंचाई भासणार नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. बियाणे, खतांची टंचाई असल्यास शासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांनी दिल्या.

बैठकीस कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर आदी यावेळी उपस्थित होते.

००००

अजय जाधव/विसंअ/4.11.2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here