राज्यात विधानसभेसाठी ६१.१३ टक्के मतदान – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

सातारा लोकसभेसाठी 67.15 टक्के मतदान

मुंबई, दि. 22 : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सरासरी 61.13 टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. तसेच सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

मतदानाची अंतिम आकडेवारी आज मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केली. राज्यात 4 कोटी 68 लाख 65 हजार 385 पुरुष, 4 कोटी 28 लाख 35 हजार 374 स्त्रिया आणि 2 हजार 637 तृतीयपंथी अशा एकूण 8 कोटी 97 लाख 3 हजार 396 मतदारांपैकी एकूण 5 कोटी 48 लाख 38 हजार 514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावलेल्यांमध्ये 2 कोटी 94 लाख 73 हजार 184 पुरूष, 2 कोटी 53 लाख 64 हजार 665 स्त्रिया आणि 666 तृतीयपंथींचा समावेश आहे. या निवडणुकीत 62.89 टक्के पुरुष, 59.21 टक्के स्त्रिया आणि 25.26 टक्के तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती देखील श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

सातारा लोकसभेसाठी 67.15 टक्के मतदान

सातारा लोकसभा मतदारसंघासाठीचे पुरुष, स्त्री, तृतीयपंथी आणि एकूण मतदार तसेच कंसात मतदानाचा हक्क बजावेले मतदार यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : पुरुष- 9 लाख 40 हजार 751 (6 लाख 45 हजार 248), स्त्री- 9 लाख 9 हजार 497 (5 लाख 94 हजार 287), तृतीयपंथी- 145 (13), एकूण- 18 लाख 50 हजार 393 (12 लाख 39 हजार 548). या निवडणुकीत पुरुष 68.71, स्त्री- 65.56, तृतीयपंथी- 27.83 याप्रमाणे एकूण 67.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.