कै. बी. जी. देशमुख निबंध स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

0
10

मुंबई, दि. 16 : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निबंधाची प्रवेशिका दि. 31 डिसेंबर 2019 पर्यंत पाठवावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

          

भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखेकडून दरवर्षी कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार सन 2019- 2020 या वर्षाच्या निबंधस्पर्धेसाठी जल व्यवस्थापन’ (वॉटर मॅनेजमेंट) आणि महाराष्ट्रातील प्रादेशिक असमानता लक्षात घेऊन राज्यातील पोषण स्थिती’ (द स्टेटस ऑफ न्युट्रिशन इन महाराष्ट्र कन्सिडरिंग रिजनल डिस्पॅरिटीज इन द स्टेट)  हे दोन विषय निवडण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी पहिले पारितो‍षिक 7 हजार 500 रुपये,  दुसरे पारितोषिक 6 हजार रुपये, तिसरे 3 हजार 500 तर उत्तेजनार्थ 2 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

निबंध हा ठरवून दिलेल्या कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून आणि3 हजार ते 5 हजार शब्दमर्यादेत असावा. निबंध हा विषयानुसार विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर टोपणनाव लिहून चार प्रतीत सादर करावा. स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये.

निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. पारितोषिक देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्या वतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत पारितोषिक विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ पारितोषक प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असणार नाही.

निबंधावर टोपणनाव लिहून निबंधाच्या चार प्रती असलेला लिफाफा, टोपणनाव व त्याबाबतचे स्पर्धकाचे संपूर्ण नाव व पत्ता असलेला वेगळा लिफाफा एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर कै. श्री. बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा,  2019-2020 असे नमूद करावे व तो मानद सचिव, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळमजला, बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजूला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई 400032 या पत्त्यावर दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यंत पाठवावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 22793430 किंवा 22024243/22854156 वर किंवा js.mrb-iipa@gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.16.10.2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here