‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम पुरस्काराने सन्मानित

0
9

नवी दिल्ली दि. 11 : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. आज केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्काराने’सन्मानित करण्यात आले.

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय,अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय आणि पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात रूग्णालय व रूग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात केंद्र शासनाच्या मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशातील रुग्णालयांना‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कार2018-19’ने गौरविण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि  विभागाच्या सचिव प्रिती सुदान यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत देशभरातील रूग्णालये,संस्था आणि  विविध राज्यांतील रूग्णालयांना एकूण90पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. तसचे देशातील एकूण11खाजगी रूग्णालयांना यावेळी  विविध श्रेणींमध्ये  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय प्रथम

राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातून तीन रुग्णालयांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्र शासनाच्या स्वच्छता मानकांची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातून प्रथम ठरले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखील सैदाने यांनी हा पुरस्कार स्वीकारला.50लाख रूपये,मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अमरावती व श्रीरामपूरचाही सन्मान

स्वच्छता मानकांची उत्तम अंमलबजावणी करणारे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय हे‘कायाकल्प पुरस्कार स्पर्धेत’राज्यात उपविजेते ठरले. अमरावतीचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम आणि  जिल्हा गुणवत्ता आश्वासक समन्वयक डॉ. मंगेश राऊत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.20लाख रुपये,मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय हे ग्रामीण रूग्णालयांमधून राज्यात प्रथम ठरले. या रूग्णालयाचाही कायाकल्प पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक  डॉ. विजय कंदेवाड आणि अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व्यवस्थापक अशोक कोठारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.15लाख रूपये,मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचाही सन्मान

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर्षी प्रथमच कायाकल्प पुरस्कार स्पर्धेअंतर्गत खाजगी रुग्णालयांनाही सहभागी करून घेतले. देशभरातील 643खाजगी रूग्णालयांनी यात सहभाग घेतला. यापैकी11रूग्णालयांची या पुरस्कारासाठी निवड झाली . खाजगी रूग्णालयांच्या प्रथम श्रेणीत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय,रूग्णालय व संशोधन संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेचे विश्वस्त तथा खजिनदार डॉ. यशराज पाटील,रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एस.चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वरूपात मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन,राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि सचिव प्रिती सुदान यांनी  उपस्थितांना संबोधित केले.

000000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.229 /दि.11.10.2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here