‘कम्युनिटी रेडिओं’नी मतदार जागृतीसाठी योगदान देण्याचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांचे आवाहन

पुणे येथे राज्यस्तरीय कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांसाठी आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन

पुणे, दि. 10: निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया असून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. सहभागपूर्ण लोकशाहीसाठी मतदार जागृतीच्या माध्यमातून समूह रेडिओनी (कम्युनिटी रेडिओ) आपले योगदान द्यावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी आज येथे केले.

पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यभरातील कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. सिन्हा बोलत होते. याप्रसंगी निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव एस. के. मिश्रा, ‘स्मार्ट व्होटच्या अर्चना कपूर आदी उपस्थित होते.

कम्युनिटी वाहिन्यांच्या स्वरूपात नव्याने रेडिओ हे माध्यम पुन्हा प्रभावीपणे उदयास आले आहे, असे सांगून श्री. सिन्हा म्हणाले की, लोकांशी जोडण्याचे हे सशक्त माध्यम ठरले आहे. लोकांना कोणताही दबाव, प्रभाव, प्रलोभनाला बळी न पडता नैतिक मूल्यांच्या आधारे मतदान करण्यासाठी जागृत करण्याचे काम कम्युनिटी रेडिओंनी करावे. त्यासाठी रेडिओंनी स्थानिक भाषा, संस्कृती लक्षात घेऊन वैविध्यपूर्ण कार्यक्रम निर्माण करावेत. मतदार जागृतीचा कार्यक्रम निरंतर चालू ठेवायचा आहे.

रेडिओ माध्यमाचे महत्त्व लक्षात घेता भारत निवडणूक आयोगाकडून स्वतःची वेब रेडिओ वाहिनी सुरू करण्यात येणार आहे. ही वाहिनी इंटरनेटच्या माध्यमातून जगातून कोठूनही लाभ घेता येईल. सर्व कम्युनिटी वाहिन्या या वेब रेडिओशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. आयोगाच्यावतीने देशात15 लाख साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार असून 6 लाख स्थापन झाले आहेत. राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतःची कम्युनिटी रेडिओ वाहिनी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार म्हणाले की, निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणता उमेदवार निवडायचा याचा निर्णय घेण्याची भूमिका म्हणजेच एक प्रकारे न्यायाधीशाची भूमिका यामुळे सामान्य मतदाराला मिळते. सर्वसामान्य नागरिकांशी जोडण्याचे कम्युनिटी रेडिओ हे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे कम्युनिटी रेडिओंनी लोकांना या न्यायाधीशांच्या भूमिकेचे महत्त्व आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण बाबी लोकांपर्यंत योग्यरित्या पोहोचविण्यासाठी कल्पकतेने कार्यक्रम निर्माण करावेत.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, मतदानाचा हक्क, आदर्श आचारसंहिता तसेच निवडणूक प्रक्रियेविषयी सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा पद्धतीने पोहोचविण्यासाठी कार्यक्रमांची निर्मिती करावी. तसेच युवक, महिला, वृद्ध आदी लक्ष्य गट ठरवून त्याप्रमाणे कार्यक्रम प्रसारणाची वेळ ठरवावी.

यावेळी श्री. सिन्हा यांच्या हस्ते मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने निर्मिती करण्यात आलेल्या निवडणूक विषयक जनजागृती ध्वनिचित्रफितींचे उद्घाटन करण्यात आले.

आभार अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मानले. यावेळी कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा स्वीप अधिकारी यांनीही प्रातिनिधिक स्वरूपात आपले अनुभव मांडले.

भारत निवडणूक आयोगाने’स्मार्टफौंडेशनच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यावेळी मीडिया कम्युनिटी कन्सल्टंट रुक्मिणी वेमराजू उपस्थित होत्या. कार्यशाळेसाठी राज्यातील सुमारे 22 कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांचे 40 प्रतिनिधी उपस्थित आहेत.