मुंबई, दि. 19 : निवडणूकविषयक कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयक गुन्हे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या ‘निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रिया‘ या पुस्तकाचे प्रकाशन काल भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या हस्ते झाले. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे (भा.प्र.से.) हे या पुस्तकाचे लेखक आहेत.
श्री. अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा, वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त संदीप सक्सेना, उमेश सिन्हा, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार, सुदीप जैन, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल मुंबईत राज्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाला श्री. अरोरा यांची प्रस्तावना असून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे पुस्तक ‘ग्रंथाली‘ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत तसेच राजकीय कार्यकर्ते ते सर्वसामान्य मतदार अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. पुस्तकात निवडणूक आयोगाची माहिती, मतदार नोंदणी प्रक्रिया आणि ओळखपत्रे, उमेदवारांची पात्रता, शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरणास बंदी, आचारसंहिता, निवडणूक विषय गुन्हे, राजकारणातील गुन्हेगारीस प्रतिबंध, प्रशासकीय यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम), टपाली मतदान, कायद्यातील नव्या सुधारणा, पेड न्यूज, उमेदवारांसाठी एक खिडकी योजना आणि मतदान जागृती कार्यक्रम याबाबत सविस्तर आणि सचित्र माहिती समाविष्ट आहे.
000