संसदीय अभ्यासवर्गाची  सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल

0
6

नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने सन 1964 पासून दरवर्षीराज्यशास्त्र लोकप्रशासनया विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीसंसदीय कार्यप्रणाली प्रथाया विषयांबाबत एक संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो. या वर्षी आयोजित करण्यात येत असलेला हा 49 वा संसदीय अभ्यासवर्ग आहे. या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संसदीय शासन प्रणालीची विद्यार्थ्याना जवळून ओळख करुन दिली जाते.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाची स्थापना सन 1911 मध्ये ‘एम्पायर पार्लमेंटरी असोसिएशन’ या नावाने प्रथम इंग्लंडमध्ये झाली. सुरुवातीला या मंडळाचे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यू फाऊंडलंड, न्यूझिलंड, दक्षिण आफ्रिका व युनायटेड किंग्डम हे देश सदस्य होते, या मंडळाने 1948 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळ’ असे नाव बदलून त्याप्रमाणे आपल्या घटनेमध्ये दुरुस्ती केली आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय लंडन – युनायटेड किंग्डम येथे आहे. संसदीय मंडळ आज राष्ट्रीय, राज्य, प्रांतिक, प्रादेशिक स्वरुपात राष्ट्रकुलातील एकूण 54 देशांतील 180 शाखांमध्ये कार्यरत असून या मंडळाचे जवळ – जवळ 17,000 पेक्षा जास्त संसद, विधानमंडळ सदस्य सभासद आहेत. दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या सोमवारी शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय व संसद इत्यादी ठिकाणी विविध उपक्रम / चर्चासत्र माध्यमातून राष्ट्रकुल दिन (Commonwealth Day) साजरा करण्यात येतो.

अभ्यासवर्गाची पार्श्वभूमी

या मंडळामध्ये विकसित तसेच अविकसित राष्ट्रे, विविध धर्म, भाषा, विभिन्न संस्कृती असलेली राष्ट्रे सभासद आहेत. ही संस्था म्हणजे शांतता य समृध्दी, प्रतिष्ठा, समता, व्यक्तीस्वातंत्र्य, कायदा व सुव्यवस्था तसेच प्रत्येक राष्ट्राच्या समाजजीवनात आवश्यक असलेल्या निष्ठा इत्यादी बाबतीत सर्व राष्ट्रांना एकत्रित बांधून ठेवणारा महत्त्वाचा दुवा आहे. ‘संयुक्त राष्ट्र संघ’ (UNO) व ‘अलिप्त राष्ट्र संघ’ (NAM) या खालोखाल ‘राष्ट्रकुल संसदीय संघटना’ (CPA) ही एक मोठी सर्वात जुनी जागतिक राष्ट्र संघटना म्हणून ओळखली जाते. या संस्थेचे सभासदत्व स्वीकारलेल्या राष्ट्रांनी केवळ शासकीय स्तरावरच नव्हे तर अशासकीय स्तरावरील सदस्य राष्ट्रांच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक जिव्हाळ्याच्या समस्यांवर विचारविनिमय करून परस्पर सहकार्य करण्याचे धोरण अंगिकारले आहे. संसदीय शासन प्रणालीमध्ये संसदीय शासन अधिक समृद्ध व बळकट करुन सर्वसामान्य जनतेमध्ये संसदीय शासन पद्धतीबाबत जागृती, प्रेम आणि आदर निर्माण करण्यासाठी  विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न करणे, परस्परांतील विविध संसदीय प्रथांचा, पध्दतीचा अभ्यास करून प्रत्येक राष्ट्राला आपापली संसदीय शासन प्रणाली अधिकाधिक समृद्ध करण्यास प्रवृत्त करणे, संसद सदस्यांची कर्तव्ये त्यांचे अधिकार व जबाबदारी ह्यामध्ये येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात विविध विषयांवर विचारांची देवाण – घेवाण हे कार्य देखील या मंडळामार्फत केले जाते. सभासद राष्ट्रांच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या परिषदा, परिसंवाद, चर्चा, भेटी इत्यादी विविध उपक्रमांद्वारे सदस्य राष्ट्रांच्या संसदीय प्रथा, प्रणाली याबाबत विचारविनिमय करुन यामध्ये सुधारणा करण्यासाठी चालना दिली जाते. त्यामुळे संसदीय लोकशाही अधिक प्रबळ व समृध्द करण्यास मदत होत असते.

महाराष्ट्राचा पुढाकार

राष्ट्रकुल संसदीय मंडळाची राज्य पातळीवर शाखा स्थापन करुन त्याद्वारे उपयुक्त उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. तत्कालीन मुख्यमंत्री, श्री. मोरारजी  देसाई यांनी दिनांक 15 जुलै, 1952 रोजी महाराष्ट्र शाखेच्या स्थापनेचा ठराव सभागृहात मांडला व सभागृहाने तो दिनांक 18 जुलै, 1952 रोजी संमत केला. तेंव्हापासून राष्ट्रकुल संसदीय मंडळाची, महाराष्ट्र शाखा आपल्या राज्यात कार्यरत आहे.

नागपूर येथे दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशन कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने सन 1964 पासून दरवर्षी राज्यातील विद्यापीठांतील ‘राज्यशास्त्र व लोकप्रशासन’ या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ‘संसदीय कार्यप्रणाली व प्रथा’ या विषयांबाबत एक संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो. या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संसदीय शासन प्रणालीची विद्यार्थ्याना जवळून ओळख करुन दिली जाते. त्यासाठी संसदीय शासन प्रणालीशी ज्यांचा निकट संबंध आला आहे व ती बळकट करण्यासाठी ज्या नामवंतांचा हातभार लागत आहे. अशा नामवंत संसदपटू व मान्यवरांची व्याख्याने आयोजित करुन त्यांचा लाभ अभ्यासवर्गामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना करून दिला जातो. याच बरोबर  वृत्तपत्र क्षेत्रातील दिग्गज तसेच रुळलेल्या वाटेवरून न जाता स्वतः नव्याने निर्माण केलेल्या मार्गाने समाजासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. अशा मान्यवरांचीसुद्धा व्याख्याने आयोजित करून त्यांच्या समृद्ध अनुभवाचा लाभ व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविला जातो.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पध्दतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना मिळत असते.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ व संसदीय अभ्यासवर्गामध्ये देशातील संसदीय लोकशाही प्रणालीचा अभ्यास असणाऱ्या मान्यवर तज्ञ वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे विधानसभा व विधानपरिषदेतील सदस्यांसाठी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन व परदेश अभ्यासदौरे याचे आयोजन केले जाते. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला जातो. उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन विधिमंडळ सदस्यांना गौरविण्यात येते.

सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल

यंदाच्या 49 व्या अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर   विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, विधान सभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उप सचिव विलास आठवले, दै.सकाळ नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे इ. तज्ञ मान्यवरांचे अभ्यासवर्गाला मार्गदर्शन होणार आहे. राज्यातील 12 विद्यापीठांतील सुमारे 100 विद्यार्थी व अधिव्याख्याते सहभागी होणार आहेत.

तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमाद्वारे या व्याख्यानांच्या प्रसारणाचा लाभ जगभरातील प्रेक्षकांना घेता येणार आहे.

मा. सभापती, विधानपरिषद (रिक्त) व अॅड. राहुल नार्वेकर, मा. अध्यक्ष, विधानसभा हे या संस्थेचे पदसिद्ध सह-अध्यक्ष असून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे मा. प्रधान सचिव, राजेन्द्र भागवत हे राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सचिव आहेत. राष्ट्रकुल संसदीय संघाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणि संसदीय लोकशाही प्रणाली अधिक प्रभावशाली करण्यासाठी महाराष्ट्र शाखा यापुढेही विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करीत राहिल.

संकलन

नागपूर शिबिर कार्यालय,

माहिती जनसंपर्क महासंचालनालय.

 

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here