मुंबई, दि, २० : कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील जैवविविधता वाढीस लागण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त कोकण महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोकण विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्या बैठकीत श्री. कल्याणकर यांनी सूचना दिल्या. या बैठकीस उपआयुक्त (नियोजन) संजय पाटील, उपआयुक्त (महसूल) मकरंद देशमुख, निवासी उप जिल्हाधिकारी मुंबई उपनगर विकास गजरे, विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांचे जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.
श्री. कल्याणकर म्हणाले की, विविध योजनांखाली प्राप्त तरतुदींचे सुयोग्य विनियोग होण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व अधिक सोयीसुविधा पुरविण्याबाबत काम करावे. सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकास क्षेत्र निहाय सुक्षम नियोजन करावे. शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी स्वतंत्र चिन्हांकित निधीचा कल्पकतेने वापर करावा. यामध्ये जिल्ह्यातील जैवविविधता वाढीस लागण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावे. कोकण विभागातील महसूल यंत्रणा बळकट करण्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा तसेच क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यकतेप्रमाणे वाहने पुरविण्यासाठी कार्यवाही करावी.
000