पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण

            मुंबई, दि. 7 : राज्यातील पवित्र जैन तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे आज राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी यांच्या हस्ते आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. याअंतर्गत राज्यातील प्रमुख 9 जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

            राजभवन येथे झालेल्या या कार्यक्रमास मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, हिरे व्यावसायिक सेवंतीभाई शाह यांच्यासह जैन समाजबांधव उपस्थित होते.

            राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले की, पर्यटन विभागामार्फत पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी हाती घेण्यात आलेला कार्यक्रम निश्चितच स्तुत्य आहे. अध्यात्माचे महत्व लक्षात घेता सध्याच्या काळात पर्यटनाबरोबरच तीर्थाटनही तितकेच महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पर्यटन विभागाला आता पर्यटन आणि तीर्थाटन विभाग असे म्हणावे, असे त्यांनी सांगितले.

            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, मोठमोठी संकटे आणि आक्रमणानंतरही आपली भारतीय संस्कृती आणि धर्म अबाधीत राहीले. जैन धर्म आणि या समाजाचे देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासात फार मोठे योगदान राहीले आहे. यापुढील काळातही प्राचीन भारताच्या मार्गावर तसेच भगवान जिनेंद्र यांच्या मार्गावर आपण पुढे गेले पाहीजे, असे त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, पर्यटन विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी निगडीत पर्यटन सर्किटच्या विकासाचा कार्यक्रम नुकताच हाती घेतला आहे. त्याचबरोबर नांदेड येथे नुकताच वीर बाल दिनानिमित्त शीख समाजासमवेत विशेष उपक्रम राबविण्यात आला. आता ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील प्रमुख 9 जैन तीर्थक्षेत्रांचा समावेश असून या क्षेत्रांची सुरक्षा, तिर्थयात्रा तसेच सुविधांच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

            महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी म्हणाले की, जैन समाजाचे योगदान फार मोठे आहे. आपले मूलतत्व या समाजाने आजही जपून ठेवले आहे. आध्यात्मिक विकासासह देशाच्या सर्व क्षेत्रामध्ये जैन समाज यापुढील काळातही योगदान देत राहील, असे त्यांनी सांगितले.

            याप्रसंगी मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह यांनी त्यागाचे महत्व सांगणारे विचार मांडले. ते म्हणाले की, आपली सर्वसमावेशक संस्कृती ही त्यागावर आधारीत आहे. हा भारताचा बहुमोल असा वारसा आहे. या वारशामुळेच आपल्या देशाचे फार पाश्चिमात्यीकरण झाले नाही. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोक त्यागाची भावना घेऊन जातात. या आधारावरच ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’ कार्यक्रम राबवावा, असे त्यांनी सांगितले.

प्रमुख ९ जैन तीर्थक्षेत्रांचा समावेश

            सटाना (जि. नाशिक) येथील श्री मांगी तुंगीजी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र देवस्थान, शहापूर (जि. ठाणे) येथील मानसमंदिर (शाहपूर जैन तीर्थ), साक्री (जि. धुळे) येथील श्री बलसाना श्वेतांबर जैन तीर्थ, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील श्री जगवल्लभ पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील कुम्भोज बाहुबली जैन मंदिर, वणी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील श्री अमिझरा शंखेश्वर पार्श्वाभ्युदय तीर्थ, पाबळ (ता. शिरुर, जि. पुणे) येथील पद्म आणि जैन तीर्थ, पायधुनी (मुंबई) येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ तीर्थ, शिरपूर (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या तीर्थस्थळांचा या पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटमध्ये समावेश आहे.