सांघिक भावना वाढीसाठी कला, क्रीडा स्पर्धा उपयुक्त – अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह

0
30

अमरावती, दि. २८ : केवळ हार-जीत हा खेळाचा उद्देश नसतो. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विविध गुण विकसित होण्यासाठी व सांघिक भावना वाढीस लागण्यासाठी कला व क्रीडा स्पर्धा उपयुक्त असते, असे प्रतिपादन राज्याचे  अप्पर मुख्य सचिव (लेखा व कोषागारे) आशिषकुमार सिंह यांनी आज येथे केले.

लेखा व कोषागारे संचालनालयाच्या लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे, आंतरराष्ट्रीय नौकानयन खेळाडू दत्तू भोकनळ, संचालक (लेखा व कोषागारे) वैभव राजेघाटगे, संचालक (स्थानिक निधी लेखा परीक्षा) माधव नागरगोजे, सहसंचालक शिल्पा पवार आदी यावेळी उपस्थित होते.

अमरातीसारख्या क्रीडा व सांस्कृतिक महात्म्य लाभलेल्या नगरीत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल श्री. सिंह यांनी समितीचे व स्थानिक कार्यालयातील सहकाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील क्षमता विकसनासाठी कला व क्रीडा स्पर्धेचा उपक्रम महत्त्वाचा आहे. विभागीय आयुक्त श्री. पांढरपट्‌टे म्हणाले की, स्पर्धा ही ‘एन्जॉय’ करण्याची गोष्ट आहे.

जिंकण्यापेक्षा मनापासून खेळणे महत्त्वाचे असते. कोषागारात हिशेब तपासणीचे काम चालते. त्याअर्थाने येथील सर्व सहकारी आकड्यांशी खेळत असतात; पण क्षेत्र कुठलेही असो, खिलाडू वृत्ती जिवंत ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या असतात. यावेळी त्यांनी आपल्या गझलेतील काही ओळीही सादर केल्या.

धावपळीच्या या युगात प्रत्येकालाच ताणतणाव अनुभवावा लागतो. वेगवेगळे छंद जोपासणे, नियमित व्यायाम आदींसाठी स्वत:साठी वेळ काढणे आवश्यक आहे. दिवसातील किमान ३० मिनिटे तरी स्वत:ला दिली पाहिजेत, असे श्री. भोकनळ यांनी सांगितले. सहसंचालक श्रीमती पवार यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचे आयोजन व विभागाच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.

विविध गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी झाला. प्रारंभी दिव्यांग विद्यार्थी कलावंतांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले. रवींद्र जोगी व प्रीती वाकोडे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक देशमुख यांनी आभार मानले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here