शासकीय कामकाज ‘मिशन मोडवर’ राबवावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 31 : “प्रशिक्षणामुळे नवीन ज्ञानप्राप्ती होऊन विषयाची उजळणी होते. प्रशिक्षण घेऊन जनतेच्या हितासाठी शासकीय कामकाजाला अधिक गती देऊन ‘मिशन मोडवर’ काम करावे”, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

डॉ.होमी भाभा राज्य समूह विद्यापीठ, मुंबई येथे नवनियुक्त विभागीय सहसंचालकांसाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, अजित बाविस्कर उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, प्रशिक्षण हे व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचे माध्यम असून सक्षम बनविण्याचे साधन आहे. नवीन विषय आत्मसात करण्यासाठी आणि त्याचे अचूक आकलन होण्यासाठी आणि योग्य अवलंबासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. विभागीय सहसंचालक हे पद महाविद्यालय आणि शासन यांच्यामधील दुवा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून प्रशिक्षण घेऊन शासकीय कामकाजाला अधिक गती द्यावी.

यावेळी नवनियुक्त विभागीय सहसंचालकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/