‘कोरोना’ संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी उत्साह राखून ठेवा
मुंबई,दि. 24 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा. कुणीही घराबाहेर पडू नये. रस्त्यावर येऊ नये. गर्दी टाळावी,असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे. देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा,असेही आवाहन त्यांनी केले आहे.
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन,शोभायात्रांचं आयोजन करुन सामूहिक पद्धतीने करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातील,परंतु शोभायात्रांचं आयोजन व सामूहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी यंदा ‘कोरोना’विरोधात लढण्याची,जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी,असेही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.