सांस्कृतिक क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे, दि. 9: सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट, साहित्य या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुकुंदनगर थिएटर अकॅडमी येथे आयोजित 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोप व पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभुषण जानु बर्मा, अभिनेत्री पद्मश्री विद्या बालन, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.

 पुस्कारार्थीचे अभिनंदन करुन श्री. मुनगंटीवार म्हणाले, मुंबई व कोल्हापूर येथील चित्रनगरी अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न आहे. राज्याने वस्तु व सेवा कर कायदा आल्यानंतर नागरिकांना सहज, सुलभरित्या चित्रपट बघता यावा यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील करमणुक कर समाप्त करण्याचा सांस्कृतिक विभागाने निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकार ओटीटी प्लॅटफार्म, पोर्टल तयार करीत आहे.  चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.

देशातील चित्रपट क्षेत्रानेदेखील आज चांगली प्रगती केली आहे. विश्वात सर्वात जास्त चित्रपटाची निर्मिती भारतात केली जाते. आपल्या चित्रपटांचे अनुकरण इतरांनी केले पाहिजे. पर्यावरणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिग्दर्शकांनी काम करावे. येत्या काळात पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत शासन विचार करेल, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून मनाला शक्ती, ऊर्जा, उत्साह देण्याचे कार्य करायचे आहे. या क्षेत्रात महाराष्ट्राने आपली विशेष ओळख जगभरात प्रस्थापित केली आहे असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. सगळ्या प्रकारच्या कलेचे अविष्कार येथे होतात. मुंबई ही हिंदी चित्रपटाची जन्मभूमी, कर्मभूमी मानली जाते त्याचप्रमाणे पुण्याला मराठी चित्रपटाची जन्मभूमी मानली जाते. त्यामुळे कोल्हापूरप्रमाणे पुण्यात उत्तम दर्जाचा चित्रनगरी निर्माण करण्याची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे मागणी केली आहे. या चित्रनगरीच्या माध्यमातून पुण्यात अनेक चांगले चित्रपट निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

सलग 21 वर्ष पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे तसेच पुरस्कारार्थीचे श्री. पाटील यांनी अभिनंदन केले.

डॉ. पटेल म्हणाले, 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुमारे 1 लाख नागरिकांनी चित्रपट बघितले. चित्रपट दाखविण्याबरोबर जागतिक पातळीवरील विविध विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

अभिनेत्री विद्या बालन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी गायक राहुल देशपांडे आणि गायिका प्रियंका बर्वे यांच्या शास्त्रीय गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ज्युरी व निवड समितीतील सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

राज्य शासनाचा संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार ‘मदार’ या चित्रपटाला तर  आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘टोरी अँड लोकिता’ (दिग्दर्शक जीन-पियरे डार्डेन, लुक डार्डेन) या चित्रपटाला देण्यात आला.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार – मंगेश बदार (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार – मिलिंद शिंदे (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार- अमृता अगरवाल (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार – आकाश बनकर आणि अजय भालेराव (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार – राहुल आवटे (चित्रपट पंचक)

 विशेष नामनिर्देशित दिग्दर्शक पुरस्कार – कविता दातीर आणि अमित सोनवणे (चित्रपट गिरकी)

विशेष नामनिर्देशित कला दिग्दर्शक पुरस्कार – कुणाल वेदपाठक ( चित्रपट डायरी ऑफ विनायक पंडीत)

महाराष्ट्र शासनाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट  आंतरराष्ट्रीय  दिग्दर्शक पुरस्कार – मारयाना एर गोर्बार्च ( चित्रपट क्लोंडिके)

एमआयटी-एसएफटी ह्युमन स्प्रिट पुरस्कार – चित्रपट क्लोंडिके

विशेष नामनिर्देशित चित्रपट पुरस्कार – बॉय फ्राम हेव्हन

विशेष नामनिर्देशित अभिनेत्री पुरस्कार -लुब्ना अझ्बल (द ब्लयू कॅफ्टन)