मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाचा किशोर गांगुर्डे यांनी स्वीकारला कार्यभार

0
51

औरंगाबाद, दि.17, (वि.मा.का.) – बदलती माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा अंगीकार करुन शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच शासकीय योजना, उपक्रमांच्या प्रसारासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक म्हणून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला.

मराठवाडा विभागाच्या माहिती संचालक पदाची सूत्रे यापूर्वी श्री. हेमराज बागूल यांच्याकडे होती. खडकेश्वर येथील संचालक (माहिती) कार्यालयात किशोर गांगुर्डे यांचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक गणेश फुंदे, माहिती अधिकारी मीरा ढास यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. गांगुर्डे यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला. आज माध्यम क्षेत्रातील बदल ओळखून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन कामकाज करण्यासोबतच समाजमाध्यमांच्या प्रभावीपणे वापरावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण देण्यात येईल, असेही श्री. गांगुर्डे यांनी सांगितले.

मराठवाडा विभागात शासकीय माहिती प्रचार-प्रसिद्धी व जनसंपर्काचे काम करताना संघभावनेने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात २००६ मध्ये सरळसेवेने सहायक संचालक (माहिती) या पदावर निवड झालेल्या श्री. किशोर गांगुर्डे यांनी विविध शाखांमध्ये काम केले आहे.  २००८ मध्ये पुन्हा सरळसेवेने वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)- गट अ पदावर त्यांची निवड झाली. विभागीय संपर्क कक्ष, वृत्त, समाजमाध्यम, महान्यूज, माध्यम प्रतिसाद केंद्र आदी विविध शाख़ांमध्ये त्यांनी काम केले आहे. गृहमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. उत्कृष्ट लिखाणाबद्दल श्री. गांगुर्डे यांना २००७ च्या राज्य शासनाच्या ‘यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट विकासवार्ता पुरस्कारा’ने देखील तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे समाजमाध्यमांवर प्रतिनिधित्व आणण्यात आणि अद्ययावत अशा माध्यम प्रतिसाद केंद्राच्या उभारणीत योगदान दिल्याबद्दल श्री. गांगुर्डे यांचा २०१७ मध्ये नागरी सेवा दिनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. १९९७ मध्ये पत्रकारितेला सुरुवात केलेल्या श्री. गांगुर्डे यांनी २००४ मध्ये चंद्रपूर येथे जाग़तिक बॅंक अर्थसहाय्यित प्रकल्पात ‘माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ’ म्हणून काम पाहिले आहे. २०१४ मध्ये जळगाव जिल्हा माहिती अधिकारी आणि नाशिक येथे २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर येथील प्रसारमाध्यम केंद्राचे नियंत्रण अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून श्री. गांगुर्डे हे मंत्रालयात कार्यरत होते. नुकतीच त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे संचालक (माहिती) पदावर सरळसेवेने थेट निवड झाली आहे. या पदावर थेट निवड झालेले श्री. गांगुर्डे हे विभागातील दुसरे संचालक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here