नंदुरबार : दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ (जिमाका वृत्त) राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये भूखंड उपलब्ध झाल्यास तेथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
ते शहादा तालुक्यातील शहादा ,राणीपूर, गणोर ,सुलतानपूर ,मळगाव येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा मुलींचे वसतिगृह व शालेय इमारतींच्या पायाभरणी कार्यक्रम तसेच जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मोहिदा,लोणखेडा, उंटावद ,म्हसावद येथील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित,आमदार राजेश पाडवी, कृषी सभापती हेमलता शितोळे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, प्रांताधिकारी महेश शेलार,गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, उप कार्यकारी अभियंता (आदिवासी) ए. पी.चौधरी, जि.प. सदस्य जिजाबाई ठाकरे, के.डी. नाईक,राजीव जाधव, गुलाब ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटिया, ईश्वर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, आदिवासी बांधवांना शिक्षण देणे हा तर शासनाचा हेतू आहेच परंतु त्याना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठीही आदिवासी विकास विभागामार्फत आम्ही प्रयत्नशील आहोत. भविष्यात केवळ शासनाने अनिवार्य केलेले शिक्षणच नाही तर ज्याला ज्या विषयातले शिक्षण व प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, ते आदिवासी विकास विभागामार्फत दिले जाईल. त्यासाठी गरजांवर आधारित सूचनांचे स्वागतच केले जाईल, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
आदिवासी करिअर अकादमी निर्माण करणार
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या विविध संधींमध्ये सहभागी होता यावे व प्रशासनात त्यांना करिअर करण्यासाठी राज्यात स्वतंत्र करिअर अकादमी निर्माण करण्यात येणार असून आठवीच्या वर्गापासूनच राज्यातील ५०० विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असेल स्वतंत्र क्रीडा अकादमी
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उपजत काही अंगभूत क्रिडा व कलागुण असतात, त्यांच्या या उपजत व अंगभूत गुणांना प्रोत्साहन देवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू व कलावंत निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत क्रिडा अकादमीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले.
दृष्टिक्षेपात…
✅ प्रत्येक विद्यापीठांत उभारणार आदिवासी वसतीगृहे.
✅ शिक्षणासोबतच आदिवासी बांधवांना सक्षम व समृद्ध बनवणार.
✅ स्पर्धा परिक्षेत आदिवासी मुले यशस्वी व्हावीत यासाठी करिअर अकादमी स्थापन करणार.
✅ मागेल त्याला पाहिजे ते शिक्षण देणार.
✅ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असेल स्वतंत्र क्रीडा अकादमी.
0000000000