विधानसभा इतर कामकाज

0
1

बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी गुन्हा; संबंधित शिक्षकांचे निलंबन  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 9 : बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी राज्य मंडळाच्या मौखिक आदेशानुसार आणि अमरावतीच्या विभागीय मंडळाच्या लेखी आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून संबंधित शिक्षकांच्या निलंबनाचे निर्देश देण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता, त्यासंबंधी श्री. केसरकर यांनी विधानसभेत निवेदन केले.

मंत्री श्री केसरकर म्हणाले, “उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा गणित या विषयाचा पेपर दि.०३.०३.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते २.१० या वेळेत आयोजित करण्यात आला होता. पेपर चालू असतानाच साधारणतः दुपारी १२.३० च्या दरम्यान एका वृत्तवाहिनीवर या पेपरची ६ आणि ७ नंबरची पाने व्हायरल झाल्याची बातमी प्रसारित करण्यात आली. ही पाने साधारणात: सकाळी १०.३० नंतर व्हायरल झाल्याचे वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आले. आरोपींपैकी ३ आरोपी शिक्षक आहेत. हे स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील शिक्षक आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. बुलढाणा यांना संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत विभागीय मंडळ, अमरावती यांच्यामार्फत कळविण्यात आले असून त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. बुलडाणा यांनी संबंधित शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्याबाबत संबंधित संस्था / शाळांना निर्देश दिले आहेत.”

डिसिल्वा हायस्कूल, कबुतर खाना, दादर पश्चिम, मुंबई या केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळून आला व या मोबाईलवर इयत्ता १२ वी गणिताच्या पेपरचा काही भाग आढळून आला. यासंदर्भात केंद्र संचालक यांनी दि.०४.०३.२०२३ रोजी शिवाजी पार्क, पोलीस ठाणे, दादर, मुंबई येथे फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडे गेला असून या गुन्ह्यामध्ये तीन अल्पवयीन व्यक्ती आरोपी आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असल्याचेही श्री. केसरकर यांनी सांगितले.

००००० 

दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबई, दि.९ : दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मूल २२ वर्षांचे होईपर्यंतच्या कालावधीमध्ये एकूण ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद करण्यात आली असल्याचे उच्च व  तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत म.वि.स. नियम ४७ अन्वये निवेदन केले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, ”सन १९९५ च्या कायद्यानुसार दिव्यांगांचे ७ प्रकार मान्यताप्राप्त होते. त्यामध्ये वाढ होऊन एकूण २१ प्रकारांना २०१६ च्या कायद्यान्वये मान्यता दिलेली आहे. त्याचा अंतर्भाव आदेशात करणे आवश्यक झाल्याने सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे. तसेच ७३० दिवस बालसंगोपन रजा घेण्यासाठी दिव्यांग पाल्याची वयोमर्यादा २२ वर्षे अशी होती. केंद्र शासनाच्या धर्तीवर सदर वयोमर्यादा काढून टाकण्यात येत आहे. याचा लाभ २२ वर्षांपेक्षा जास्त वयाचे दिव्यांग पाल्य आहेत, अशा शासकीय महिला कर्मचारी/ पुरुष अधिकारी कर्मचारी यांना होईल असे त्यांनी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

राज्यात जिल्हानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. 9 : राज्यात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित कार्यवाही केली जाते. येत्या काळात दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागांमार्फत विविध मोहिमा राबवण्यात येणार आहेत. राज्यात जिल्ह्यानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी कांदिवली येथून भेसळयुक्त दूध साठा जप्त केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री राठोड म्हणाले की, मुंबई शहरामध्ये येणारे दूध मानकाप्रमाणे आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी नाका मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेत दुधाची चाचणी त्याच ठिकाणी करून दूध कमी दर्जाचे आढळल्यास त्याची कायदेशीररित्या विल्हेवाट केली जाते. या विभागातील रिक्त पदे येत्या तीन महिन्यात भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, तसेच दुधातील भेसळ तपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याबाबतची लवकरच एसओपी तयार करण्यात येईल. दुग्धविकास मंत्री यांच्या समवेत लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असेही मंत्री राठोड यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रवींद्र वायकर, हरिभाऊ बागडे, राम कदम, राम सातपुते, जयकुमार रावल, देवयानी फरांदे, पृथ्वीराज चव्हाण यांनी सहभाग घेतला.

००००

शैजला पाटील/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here