विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
1

परभणीतील भाजीपाला विक्रेत्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने फेर तपासणी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि 10 : परभणी येथील भाजीपाला विक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलेले प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, यासंदर्भात सत्य परिस्थिती तपासण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महिन्याभरात फेर तपासणी करणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

परभणी येथील पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याबाबत सदस्य अब्दुल्ला खान दुर्राणी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, भाजीपाला विक्रेत्यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांवर खंडणीबाबत गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र या तक्रारीबाबत सखोल चौकशी एका महिन्याच्या आत करण्यात येईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. निर्दोष व्यक्तींवर अन्याय होणार नाही याची काळजी शासन घेणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  यावेळी दिली.

०००

पोलीस पाटील यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 10 : ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक आहे. यासाठी  लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.  यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन 3 हजार होते. ते  सन 2019 मध्ये वाढवून 6 हजार 500 इतके करण्यात आले आहे. यामध्ये अधिक वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच ग्राम पोलीस पाटील अधिनियम सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल. तसेच पोलीस पाटलांच्या विविध समस्या सोडविण्यात येतील.

पोलीस पाटील यांच्या नियुक्तीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक दाखले यांची पुर्तता करतानाच ही प्रक्रिया वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नूतनीकरणाचा कालावधी हा 10 वर्षाचा करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची बैठक व्यवस्था व्हावी यासाठी कार्यवाही करण्यात येईल. ‘कोविड’ काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सानुग्रह साहाय्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करून पात्र पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

000

श्रद्धा मेश्राम/स.सं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here