विधानसभा प्रश्नोत्तरे

0
6

ठाणे महापालिकेने केलेल्या विकासकामांची निविदा प्रक्रिया नियमानुसार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई दि. 14:- ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहरांतर्गत विविध विकास कामांची निविदा काढली. या अंतर्गत होणाऱ्या विकास कामांची गुणवत्ता तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आली असून शहरातील विकास कामांची निविदा प्रक्रिया ही नियमानुसारच करण्यात आली असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य कालिदास कोळंबकर यांनी ठाणे शहरातील विकास कामे आणि सुशोभिकरणाच्या कामांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.सामंत म्हणाले, ठाणे महापालिकेने ठाणे शहरांतर्गत सुरू करण्यात आलेली विकास कामे निविदेतील विहित अटी व शर्तीनुसार योग्य गुणवत्ता राखून पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कंत्राटदाराचे देयक अदा करण्यात येईल. या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीतील मुद्यांची शहानिशा करण्याबाबत आयुक्त ठाणे महापालिका यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार व सदस्य सर्वश्री संजय केळकर, रवींद्र वायकर यांनी सहभाग घेतला.

००००

ठाणे येथील फ्लेमिंगो पार्कच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई दि. 14 : ठाणे येथील ‘फ्लेमिंगो पार्क’च्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखडा समितीमध्ये निरी संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश करुन हा आराखडा लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.

सदस्य आशिष शेलार यांनी ठाणे येथील खाडीला रामसर दर्जा प्राप्त झालेला असताना खाडीतील प्रदूषणात वाढ होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, ठाणे खाडीतील प्रदूषण प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले आहेत. मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ठाणे येथील खाडीत सोडण्यात येणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळे खाडीतील माशांच्या पुनरुत्पादनावर परिणाम झाल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. ठाणे खाडीतील प्रदूषणाबाबत मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व लोकप्रतिनिधी यांची लवकरच बैठक बोलावून याबाबत चर्चा, उपाययोजना करण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

शाहूफुलेआंबेडकर निवासी शाळेच्या शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. १४ : शाहू, फुले, आंबेडकर अनुसूचित जातीच्या मुलामुलींच्या निवासी शाळांना अनुदान देण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. या शाळेतील शिक्षकांच्या वेतन श्रेणीबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य नीलेश लंके यांनी राज्यातील १६५ केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला- मुलींसाठीच्या निवासी आणि अनिवासी प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी सहाय्यक अनुदाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातून केंद्रीय अनुदानासाठी ३२२ आश्रमशाळांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ३४ आश्रमशाळांना केंद्र शासनाने मानधन स्वरूपात अनुदान मंजूर केले आहे. २८८ आश्रम शाळांना केंद्र शासनाने अनुदान मंजूर न केल्यामुळे या आश्रम शाळांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर शाहू, फुले, आंबेडकर निवासी/अनिवासी शाळा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत १६५ आश्रम शाळांना तपासणीच्या अधीन राहून सन २०१९-२० या वर्षापासून २० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे -पाटील यांनी सहभाग घेतला होता.

0000

शैलजा पाटील/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here