नागपूर, दि. 16 – जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन उद्या, शुक्रवार दि. 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. जी-20 निमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचाही यावेळी गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. दि. 17 ते 24 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी निःशुल्क खुले असणार आहे. झिरो माईलजवळील जिल्हा मध्यवर्ती संग्रहालयात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील दर्जेदार छायाचित्रे यावेळी पहायला मिळणार आहे. नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन आणि जिल्हा मध्यवर्ती संग्रहालय यांचे विशेष सहकार्य या प्रदर्शन आयोजनासाठी मिळाले आहे.
नागपूर शहरामध्ये जी -20 अंतर्गत सिव्हिल 20 या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या छायाचित्र स्पर्धेला छायाचित्रकारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.
जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
छायाचित्र स्पर्धेतील विजेते
‘अ’ गटात विदर्भातील वाघांचे अस्तित्व व विदर्भातील जंगल या विषयावरील फोटो स्पर्धेत नारायण मालू प्रथम, प्रथिश के. द्वितीय तर आरती फुले यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.
‘ब’ गटातील नागपूर हेरिटेज या विषयावरील स्पर्धेत रोहीत लाडसगावकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. ‘क’ गटात नागपुरातील सण, उत्सव, खाणपान व परंपरा या विषयावर निधीका बागडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. ‘ड’ गटात नागपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे या विषयावर अविनाश चौधरी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
एकूण पाच गटात ही स्पर्धा विभागण्यात आली होती. यात अ गटात विदर्भातील वाघांचे अस्तित्व व विदर्भातील जंगल, ब) नागपूर हेरिटेज, क ) नागपुरातील सण, उत्सव, खाणपान व परंपरा, ड) नागपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि इ) नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे या गटांमध्ये ही स्पर्धा विभागण्यात आली होती. यापैकी विदर्भातील वाघांचे अस्तित्व आणि विदर्भातील जंगल या विषयावर निवड समितीने प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन विजेत्यांची निवड केली आहे. तर उर्वरित तीन गटामध्ये समितीने प्रथम पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. तर नागपूर जिल्ह्यातील प्रेरणास्थळे या गटात प्रवेशिका प्राप्त झाली नाही.
****