तृणधान्यांचे एकच महत्त्व, मिळतील भरपूर जीवनसत्त्वं

संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. मानवी आरोग्यवर्धनात पौष्टिक तृणधान्यांची भूमिका महत्त्वाची असून, तृणधान्य पिकांतील पोषणमूल्ये व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमाणसांत पोहोचण्याची आवश्यकता आहे. याचा वेध घेणारा हा लेख…

भारत हा तृणधान्य पिकवणारा जगातील एक प्रमुख देश आहे. भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पौष्टिक तृणधान्य सेवनाला पूर्वापार महत्त्व आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी व शारीरिक तंदुरूस्तीसाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे काळाची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष या संकल्पने अंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा या पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांचे पोषण मूल्य व आरोग्य विषयक फायद्यांबाबत जनजागृती करून मानवी आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हा प्रमुख हेतू आहे. तसेच, तृणधान्यांचे उत्पादन व उत्पादकता वाढ, निर्यातवृद्धी, नव उद्योगातून व्यावसायिक दृष्टिकोन वाढविणे, प्रचार प्रसिद्धीतून जनजागृती निर्माण करणे, धोरणात्मक निर्णयातून अंमलबजावणी, मूल्यवर्धन, प्रक्रिया व पाककृती विकास यावर भर देण्यात येत आहे. त्यादृष्टीने कृषि विभाग व संलग्न विभागांच्या समन्वयाने या वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या अनुषंगाने ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा या तृणधान्यांचे आरोग्याच्या दृष्टीने  महत्त्व जाणून घेऊया.

ज्वारी – ज्वारीमध्ये भातापेक्षा जास्त पोषक तत्वे असून ती तंतुमय पदार्थांनी युक्त असते. तसेच तिच्यामध्ये  थायमिन, रायबोफ्लेवीन, फोलिक अॅसिड, कॅल्शियम असते, ती लोह, झिंक, सोडियम, फॉस्फरस व बिटा कॅरोटीन यांनी समृद्ध आहे. ज्वारी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते व रक्ताभिसरण वाढवते. हाडांच्या आरोग्यासाठी चांगली असून, तिच्या सेवनाने शरीरातील ऊर्जा पातळी व हृदयाचे आरोग्य सुधारते.

बाजरी – बाजरीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, बी, आणि फॉस्फरस अधिक मात्रेत उपलब्ध असते. शिवाय, लोह, फोलेट व मँगेनिज यांची उपलब्धता अधिक असून, अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते.

नाचणी – नाचणीमध्ये प्रथिने, व्हिटामिन ए, फॉस्फरस, अॅमिनो अॅसिड मुबलक प्रमाणात असते. तसेच, कॅल्शियमची उपलब्धताही अधिक प्रमाणात असते.

वरई (भगर) – वरई ही ग्लुटेनमुक्त असून, मँगेनिजने समृद्ध असते. हृदय विकार प्रतिबंधाकरिता उपयुक्त असते. वरई रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित करते. स्तनांच्या कर्क रोगावर गुणकारी असते. ग्लुटेनमुक्त असल्याने सेलिक आजारावर गुणकारी असते.

राळा – राळा हे धान्य कॅल्शियम, तंतुमय पदार्थ व तांबे मुलद्रव्याने भरपूर असून रक्तातील साखर व मेद नियंत्रित करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पचन संस्थेच्या विकारावर परिणामकारक असते.  नॉन अॅलर्जिक व पचनास हलके असते.

राजगिरा – राजगिरा हा प्रथिनांचा चांगला स्त्रोत असून, त्यामध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक ही मुलद्रव्ये भरपूर असतात. त्वचा व केसांच्या आरोग्यास उपयुक्त आहे. पचनसंस्था सुदृढ बनविते. स्नायूंच्या बळकटीकरणासाठी उपयुक्त असते.

कोडो/ कोद्रा – लेसिथिन, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक यांनी समृद्ध असते. ते ग्लुटेनमुक्त असून, मज्जा संस्था मजबुतीस उपयुक्त असून पचनास हलके असते.

सावा – सावा हे धान्य लीनोलिक, पाल्मिटिक, ओलिक अॅसिडचा उत्तम स्रोत असून, रक्तदाब व मधुमेहावर गुणकारी आहे. तसेच, ते आतड्यांच्या आजारावर परिणामकारक असते.

(संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर)