विधानसभा प्रश्नोत्तरे

0
30

मुंबई वडोदरा महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 25 : पालघर जिल्ह्यातील मुंबई वडोदरा महामार्गासाठी भूसंपादन करताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत, त्यांना मोबदला देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य श्रीनिवास वनगा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, विद्यावासिनी कॉर्पोरेशन प्रा. लि.या कंपनीस जादा आकारण्यात आलेला मोबदला वसूल करण्यासाठी त्यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलाव विक्री करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या बाबतची कार्यवाही पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांना मोबदला अदा करण्याची कार्यवाही करण्यात येईल.या महामार्गासाठी भूसंपादनात मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येत आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडून दस्त नोंदणी अहवाल मागविणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 25 : दुय्यम निबंधक कार्यालय, नागपूर येथील दस्तातील अनियमिततेबाबत दस्तनिहाय स्वतंत्र अहवाल जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडून मागविण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य विकास कुंभारे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दस्त नोंदणीत अनियमितता असल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने याबाबत समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल मागविण्यात येईल. तसेच दस्त नोंदणीबाबत विशेष शिबिर घेण्यात येईल.

०००

शैलजा पाटील/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here