भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची उपमुख्यमंत्र्यांकडून लोकार्पणपूर्व पाहणी

0
7

           नागपूर, 04: कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या  भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण पूर्व पाहणी केली. सचित्र रामायण व भारतीय स्वातंत्र्य लढ्यांचे दालन या दुमजली इमारतीत साकारले आहे.

            भारत देशाच्या पौराणिक, ऐतिहासिक वैशिष्ट्यांसह  स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानाची सचित्र माहिती दर्शविण्यात आलेल्या या सांस्कृतिक केंद्राची इमारत उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे. या इमारतीच्या लोकार्पणपूर्व पाहणीसाठी उपमुख्यमंत्री याठिकाणी आले होते. आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार  प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, राजेंद्र पुरोहित, राकेश पुरोहित, भारतीय विद्याभवनच्या संचालक अन्नपूर्णी शास्त्री आदी उपस्थित होते.

         तीन एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या सांस्कृतिक केंद्राची दुमजली इमारत आहे. पहिल्या माळ्यावर महाकाव्य रामायणाच्या प्रसंगांची विविध चित्रांच्या माध्यमातून मांडणी केली आहे.  या दालनात रामायणाचे रचियता महर्षी तुळशीदास यांच्यापासून ते रामायणाची मूळ कथा एकूण 108 चित्रांच्या माध्यमातून  मांडण्यात आली आहे. चित्रांतील प्रसंग  व व्यक्तिमत्व समजण्यासाठी हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतील माहितीही या ठिकाणी आकर्षकरित्या देण्यात आली आहे. राजमहालाप्रमाणे आतील सजावट असून तशीच रंगसंगती, ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजना करण्यात आली आहे.

     इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित चित्र दालन साकारण्यात आले आहे. 1857 ते 1947 या कालावधीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणारे क्रांतिकारक आणि 1947 ते 2023 पर्यंत देशासाठी बलिदान देणाऱ्या परमवीर चक्र प्राप्त जवानांच्या कार्याची माहिती येथे देण्यात आली आहे. श्री.फडणवीस यांनी या सांस्कृतिक केंद्राच्या दोन्हीही दालनाची पाहणी केली. येथील विश्वस्तांसोबत बैठक घेऊन या उपक्रमाची माहिती जाणून घेतली.

     तत्पूर्वी, श्री फडणवीस यांनी या परिसरात आगमन झाल्यानंतर महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले आणि आरती केली. मंदिराच्या विश्वस्तांसोबत त्यांनी बैठक घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here