रोजगार हमीकडून गरीबी निर्मूलनाकडे योजनेचा प्रवास : शांतनु गोयल

नागपूर दि. 6 : हाताला काम नसणाऱ्यांना हमीने रोजगार देण्याचे काम करणारा कायदा म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची ( मनरेगा ) ओळख होती. मात्र महाराष्ट्रात आता शाश्वत आर्थिक स्रोत निर्माण करणारी योजना म्हणून मनरेगा पुढे येत आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मनरेगा आयुक्त शांतनु गोयल यांनी केले आहे.

            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण शेतकरी, शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा, महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि पंचायत राज संस्थांना बळकट करून रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

            यामध्ये कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. रोजगाराच्या हमी सोबतच गेल्या दोन वर्षात या कायद्याअंतर्गत लाभ मिळू शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरी, शेततळे, चेकडॅम, गुरांचे गोठे, सोकपीट, अंगणवाडी, गोडाऊन, बांधकाम अशा प्रकारची कामे करण्यात आली आहे.

            महाराष्ट्र मध्ये मोठ्या संख्येने गुरांचे गोठे बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षात झाले आहे. 2021 -22 मध्ये 9657 तर 22 -23 मध्ये 18879 गोठे बांधण्यात आले आहे. जनावरांसाठी निर्माण करण्यात आलेल्या या काँक्रीटच्या गोठ्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. जनावरांना मोकळी जागा,स्वच्छता, खत निर्मिती आणि दुग्ध व्यवसायातील वृद्धी यासाठी गोठ्यांची निर्मिती कारणीभूत ठरली आहे . यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मजबुती मिळाली आहे.

            स्वतःच्या शेतामध्ये विहीर बांधायला मिळणे यासारखा आनंद नाही. महाराष्ट्रामध्ये या योजनेअंतर्गत 2021 -22 मध्ये 9452 तर 22 – 23 मध्ये 8309 विहिरी बांधण्यात आल्या आहे. या योजनेतून शेततळे निर्माण करण्यातही अनेकांनी लाभ घेतला असून 2021 -22 मध्ये 1425 तर 2022-23 मध्ये 1468 शेततळे निर्माण झाले आहे.

            गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्यात आला आहे. 700 लक्ष मनुष्य दिवस काम या योजनेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. मत्ता निर्मितीमध्ये 18 हजार गुरांचे गोठे मत्ता निर्मितीचा भाग म्हणून तयार करण्यात आले आहेत. 265 प्रकारची कामे या योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.