चंद्रपूर, दि. 9 : क्रीडा क्षेत्रात आपले राज्य पुढे जावे व राज्यात चंद्रपूर जिल्हा अग्रस्थानी राहावा, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. राज्यातील तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त आपल्या जिल्ह्यात आहेत. चंद्रपूर क्रीडा संकुल, बल्लारपूर क्रीडा संकुल आणि सैनिक शाळेत हे सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आले आहेत. आता चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर मुलींसाठी एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र तयार होत असून या उपकेंद्रात पारंपरिक खेळ खेळण्यासाठी मुलींकरिता अत्याधुनिक इनडोअर स्टेडियम उभारण्यात येईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मुल येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर नागपूर विभाग क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, संध्या गुरनुले, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, विदर्भ कुस्तीगीर संघटनेचे सचिव गणेश कोहळे, विदर्भ केसरी संजय तिरडकर, श्री. वसुले, श्री. पाटणकर आदी उपस्थित होते.
वाघाच्या भूमीत सर्व खेळाडू वाघासारखाच पराक्रम दाखवतील, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, मुल वासीयांसाठी राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आयोजन ही अभिमानाची बाब आहे. संध्या गुरनुले, प्रभाकर रणदिवे तसेच येथील येथील क्रीडाप्रेमींनी तालुका स्तरावर या स्पर्धा घेण्यासाठी आपल्याकडे इच्छा व्यक्त केली. त्यांची ही मागणी राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांना सांगितल्यावर त्यांनी मूल येथे या स्पर्धा घेण्यासाठी होकार दर्शविला.
2019 मध्ये राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक स्टेडियम निर्माण करण्याची घोषणा आपण केली होती. त्यानुसार काही स्टेडियम अत्याधुनिक झाले. जुबली हायस्कूलच्या जागेवर शहीद बाबुराव शेडमाके स्टेडियम तयार करण्यात येईल. तालुका स्तरावर प्रत्येकी एक कोटी रुपये देऊन अत्याधुनिक जीम तयार करण्याचे निर्देश आपण दिले आहे. वन अकादमी मध्ये स्टेडियम करिता 15 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. विसापूर येथील सैनिक शाळा देशातील उत्तम सैनिक शाळा असून येथील फुटबॉल ग्राउंड युरोप सारखे आहे. त्यामुळेच जुलैमध्ये सिनेस्टार येथे फुटबॉल खेळण्यासाठी येणार आहेत. राज्यात पोलिस विभागाचे सर्वात सुंदर जिम चंद्रपुरात आहे.
प्रस्तावित एस.एन.डी.टी. विद्यापीठात लगोरी, खो-खो यासारख्या पारंपरिक खेळांसाठी स्टेडियम तयार करण्यात येईल. फक्त मुलींसाठी देशातील हे पहिले स्टेडियम राहणार आहे.
विविध स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोहिनूर निवडण्यात येईल. मिशन कोहिनूर अंतर्गत उत्कृष्ट खेळाडूंचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंनी शक्तीने भाग घ्यावा. आपले उत्कृष्ट प्रदर्शन येथे करावे. पराजय झाला तरी निराश होऊ नका, वाघाच्या भूमीतून प्रेरणा घेऊन जा, असे आवाहन त्यांनी सर्व खेळाडूंना केले. तसेच येथे आलेल्या सर्व खेळाडूंना व त्यांच्या पालकांना मोफत ताडोबा सफारी करण्यात येईल. त्यासाठी क्रीडा विभाग, वन विभाग तसेच पालकमंत्री कार्यालयाने त्वरित नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
क्रीडा उपसंचालक शेखर पाटील म्हणाले, राज्यात पहिल्यांदाच तालुका स्तरावर भव्य दिव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे योगदान आहे. येथे आलेल्या खेळाडूंनी सर्वोत्तम सर्वोत्तम प्रदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रस्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड म्हणाले, सुरुवातीला या स्पर्धा रायगड जिल्ह्यात होणार होत्या. मात्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील क्रीडाप्रेमींची मागणी क्रीडामंत्र्यांच्या कानावर टाकली आणि या स्पर्धा मुल येथे खेचून आणल्या. या स्पर्धेसाठी पालकमंत्र्यांनी 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. खेळाडूंसाठी जेवण, निवास व्यवस्था आदी उत्तम सोयी देण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी केले होते. त्यानुसारच सर्व सोयी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी नकुल राऊत व विजय तेलमसरे या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पोंभूर्णा तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे 23 लाख रुपये परत मिळून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा विशेष सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षक उमेश कडू तर आभार मुलचे तालुका क्रीडा अधिकारी विजय डोबाळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.