सर्व सुविधांनीयुक्त इनडोअर स्टेडियमची उभारणी करावी; तालुका क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरू करावे- पालकमंत्री

0
5

नंदुरबार : दिनांक 13 एप्रिल 2023 (जिमाका वृत्तसेवा) नंदुरबार शहरात सर्व सुविधांनीयुक्त वातानुकुलित इनडोअर स्टेडियमची निर्मिती करण्याबरोबरच तालुका क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्यासह जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री डॉ. गावित म्हणाले, मिशन संकुल अंतर्गत शासनाने जिल्हा क्रीडा संकुल या प्रकल्पास सध्याची अनुदान मर्यादा रु. 800.00 लक्ष वरुन सुधारित अनुदान मर्यादा रु.1500.00 लक्ष केलेली आहे.  या निधीतुन इनडोअर हॉल-अद्यावत करणे, 400 मी ट्रॅक सिंथेटिक करणे, वसतीगृह इमारत अद्यावत करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, नविन वसतीगृह इमारत नविन बांधणे, वसतीगृह इमारत अद्यावत करणे, मुलांमुलींकरीता स्वच्छता गृह बांधणे, विविध क्रीडांगणे तयार करणे, जलतरण तलाव अद्ययावत करणे ही कामे प्राध्यान्य क्रमाने हाती घेण्यात यावीत.

ते पुढे म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुल समितीने नियुक्त केलेल्या वास्तुविशारदाच्या  नियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, जेणेकरुन सुधारित शासन निर्णयान्वये जिल्हा क्रीडा संकुलातील विकसित करावयाच्या क्रीडा सुविधांचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करणे सोयीचे होईल.  जिल्हा क्रीडा संकुलातील शुटींग रेंज हॉल व वसतीगृह इमारत मागील संरक्षण भिंत पडलेली आहे. सदर भिंत पडलेली असल्यामुळे मोकाट गुरे संकुलात येतात त्यामुळे संरक्षण भिंत व मुख्य व्दार दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी रु.99.64 लक्ष व रु.99.77 लक्ष इतक्या रकमेचे असे दोन अंदाजपत्रक सादर केलेले होते. त्यापैकी जिल्हा क्रीडा संकुलाचे उत्तर व पश्चिम बाजूची भिंतीचे अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आलेली असुन उर्वरीत पुर्व व दक्षिण बाजूची संरक्षक भिंत दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

तालुका क्रीडा संकुलाच्या कामास प्राधान्य

 तालुका क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधांचा कामे प्राधान्य क्रमाने हाती घेउन  बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.  तालुका क्रीडा संकुलाच्या  उभारणीसाठी  रु.500.00 लक्ष इतकी अनुदान मर्यादा असुन आदिवासी विकास विभागातून त्यासाठी जास्तीचा निधी देण्यात येईल. त्यात 200 मी. धावनपथ तयार करणे, इनडोअर हॉल वुडन सिंथेटीक फ्लोरिंगसह, चेजिंग रुम, स्टोअर रूम, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉनटेनिस, ऑर्चरी कार्यालयीन इमारत, पाणी पुरवठा व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत इत्यादी क्रीडा सुविधा तसेच प्रेक्षक गॅलरी व गॅलरीच्या मागील बाजूस तालुका क्रीडा संकुलाच्या उत्पन्नाचा दृष्टीने रोडालगत दोन मजली दुकान गाळे तयार करण्यासाठी बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करावेत, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here