कांदा चाळ योजनेद्वारे बाजार दराच्या अनिश्चिततेवर मात

0
11

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी काही शेतकरी पर्यायी व्यवस्था करतात आणि संभाव्य नुकसानीपासून स्वतःची सुटका करून घेतात. यशवंत महात्मा माने त्यापैकीच एक.

श्री. माने यांचे गाव द. सोलापूर तालुक्यातील कंदलगाव असून 2 हेक्टर बागायत जमीन ते कसतात. एकूण जमिनीपैकी 1.20 हे. क्षेत्रावर मागील 10 वर्षापासून ते खरीप व रब्बी हंगामात ऊस आणि कांदा लागवड करतात. कांदा लागवड करुन उत्कृष्ट उत्पादन त्यांना मिळते. मात्र, गेल्या काही वर्षापासून अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा काढल्यानंतर बाजारामध्ये दर फारच कमी मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागले. कांदा साठवणूक करण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने नाइलाजाने मिळेल त्या दराने त्यांना कांदा विकावा लागत होता. बाजारातील कमी दर व उत्पादन खर्च वाढल्याने कांदा लागवड करणे परवडत नव्हते.

याच दरम्यान त्यांना कांदा चाळ योजनेची माहिती मिळाली. कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक फलोत्पादन विकास अंतर्गत 25 मेट्रीक टन कांदाचाळ योजनेसाठी श्री. माने यांनी अर्ज केला. अर्ज केल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांची निवड झाली. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना कांदाचाळ करिता पूर्वसंमती पत्र देण्यात आले.

याबाबत यशवंत माने म्हणाले, कांदाचाळ मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी 25 मेट्रिक टन कांदाचाळ मी तयार केली आहे. त्यासाठी एकूण 2 लाख 12 हजार खर्च आला असून मला 87 हजार 500 रू. अनुदान मिळाले. खरीप व रब्बी हंगामामध्ये 1.50 हे कांदा लागवड केली असून 38 टन कांद्याची मी कांदाचाळमध्ये साठवणूक केली. सन 2022-23 मध्ये सततचा पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे बाजारभावात कांद्याचे दर सारखे खाली-वर होत असून 2200 रु. प्रति क्विंटल एवढ्या चढ्या दराने 25 मेट्रिक टन कांदा मी विकलेला आहे. माझ्या घरी वडील, भाऊ व आमच्या दोघांच्या कुटुंबातील 12 सदस्य आहोत. आमची मुलं शिक्षण घेत असून, कांदा चाळीतून मिळालेला नफा आमच्या कुटुंबासाठी पूरक उत्पन्न ठरले आहे.

सदर कांदा चाळीस तालुका कृषि अधिकारी रामचंद्र माळी, मंडळ कृषि अधिकारी के. एम. लादे व कृषि सहाय्यक अशोक राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. कांदा साठवणूक करण्यासाठी कांदाचाळ हे अत्यंत उपयोगी व फायदेशीर योजना आहे. कांदाचाळ उभारण्यासाठी कृषि विभागातील अधिकारी व सदर कांदा चाळीस तालुका कृषि कर्मचारी यांनी मार्गदर्शन व मदत केलेली आहे. यासाठी यशवंत माने यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here