पालकमंत्र्यांकडून शिरूर तालुक्यातील विकासकामांचा आढावा

पुणे, दि.१३: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिरुर पंचायत समिती येथे आयोजित बैठकीत तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी आमदार अशोक पवार, पालकमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, गट विकास अधिकारी अजित देसाई, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, एमआयडीसी परिसरातील गुन्हेगारी प्रवृती रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. नगरपंचायतीअंतर्गत दशक्रिया घाटाभोवती असलेली अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही करावी. दूषित पाण्याचा प्रश्न पाणी पुरवठा विभागाने मार्गी लावावा. जल जीवन अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करण्यात यावी. उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेता पाणी काटकसरीने वापरण्याबाबत नियोजन करावे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे देण्याची कार्यवाहीला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. शहरामध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही पालकमंत्री म्हणाले.

महसूल विभागाअंतर्गत गौण खनिज उत्खनन, पाणंद रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जिल्हा नियोजनमधून झालेली प्राप्त निधी; त्याअंतर्गत सुरु असलेली कामे, नगर परिषद कार्यालयांनी शहरात सुरु असलेली कामे, कृषि विभागाअंतर्गत कांदा अनुदान, अवकाळी पाऊस त्याअनुषंगाने देण्यात येणाऱ्या मदतीबाबत कार्यवाही, महाडीबीटीवरील योजना, शिक्षण विभागाअंतर्गत शाळा दुरुस्ती, नवीन खोल्या, संरक्षक भिंत, शौचालय, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य विभागाअंतर्गत कोविड-१९ अनुषंगाने सक्रिय रुग्ण, बरे झालेले रुग्ण, लसीकरण, औषध पुरवठाबाबत बैठकीचे आढावा घेण्यात आला.

एमआयडीसी परिसरातील गुन्ह्याचे प्रमाण, गुन्हे सिद्धतेचे प्रमाण, सीसीटीव्ही, उपलब्ध मनुष्यबळ, लम्पी आजार, लसीकरण, आजारी जनावरे, शेतकरी प्रबोधन, वृक्ष लागवड, सीएसआर फंडातून वृक्ष लागवडीसाठी प्राप्त अनुदान, सोलर पंप वितरण, कृषी पंप वीज जोडणी, पाणी पुरवठ्यासाठी नळ जोडणी, केंद्र व राज्य शासनाच्या योजनेची अंमलबजावणी, धरणातील पाणीसाठा, पर्जन्यमान आदी विषयांचादेखील आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.

बैठकीपूर्वी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते शिरुर पंचायत समिती येथील महाराणी येसूबाई सभागृह नूतनीकरण, सिमेंट काँक्रिट रस्ता, पेव्हींग ब्लॉक तसेच छत्रपती संभाजी महाराज सभागृह नुतनीकरण व पंचायत समिती सुशोभीकरण करणे या कामांचे उद्घाटन करण्यात आले.