जिल्ह्याच्या विकासात भर घालण्यासाठी परस्पर सहकार्याने कार्य करावे- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

0
11

सोलापूर, दि. २४ (जि. मा. का.) : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासन सकारात्मकतेने काम करत असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी परस्पर सहकार्याने जिल्ह्याच्या विकासात भर घालण्यासाठी कार्य करावे. अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेची कामे आत्मियतेने करून मार्गी लावावीत, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा विकास यंत्रणांतर्गत सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकाऱ्यांचा कामकाज आढावा व पदाधिकारी यांच्या समवेत समन्वय बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, रणजीतसिंह मोहिते-पाटील, समाधान आवताडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. परंतु, काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यांना तात्काळ मदत करावी. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही विचार करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महाराजस्व अभियानातून शेतरस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाकडून १६०० रोव्हर मोजणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे जिल्ह्यातील जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे भविष्यात मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच, हातपंप दुरूस्तीची कामे तात्काळ करावीत. मंगळवेढा येथे बसवेश्वर स्मारकाचे काम तात्काळ मार्ग लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. उजनी विभागाचा उजवा कालवा फुटल्याने शेतात पाणी गेल्याने शेत, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेत, पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पाटबंधारे व कृषि विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here